तुम्हाला मोदी सरकारचा भाग व्हायचयं? आपल्या देशाची वाटचाल योग्य दिशेने व्हावी यासाठी योगदान देण्याची आणि आपल्या संकल्पना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी मोदी सरकारने इंटरनेटच्या महाजालात नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
Mygov.nic.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून या सरकारच्या जमेच्या बाजू, सरकारने पुढाकार घेतलेल्या योजनांवर आपले मत मांडण्याची आणि नव्या संकल्पना सुचविण्याची संधी देशातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर कोणीही रजिस्ट्रेशन करून अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया आणि संकल्पना नोंदवू शकतो.
संकल्पना आणि सूचना देण्याव्यतिरिक्त लॉगिंग केलेल्या नेटिझन्ससमोर गंगोत्रीच्या विकासासाठी सूचना, गंगा शुद्धीकरणासाठी १० महत्त्वाचे मुद्दे सुचविणे इत्यादी कामेदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संकेतस्थळ हाताळण्यासही सोपे असून यामध्ये अतिशय सोयीस्कररित्या गंगा शुद्धी, स्त्री-शिक्षण, ग्रीन इंडिया, रोजगारनिर्मिती, अनिवासी भारतीयांचे योगदान, कौशल्य विकास आणि स्वच्छ भारत असे विभाग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील कोणत्याही विभागात सामील होऊन आपल्या सुचना, संकल्पना, प्रश्नोत्तरे मांडता येतात.