स्वतःवरील शस्त्रक्रियेसाठी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांना मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने सहा आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात पेसमेकर बसविण्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे नेते असलेल्या ७८ वर्षांच्या चौताला हरियाणातील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यासोबत अन्य ५४ जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. पाच लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि दोन जामीनदारांच्या हमीवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. चौताला यांना आपला पासपोर्ट सत्र न्यायालयाकडे जमा करण्याचा आणि न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय दिल्लीबाहेर न जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. कारागृहातून सुटका झाल्यावर २४ तासांच्या आत मेंदाता मेडिसिटी रुग्णालयात दाखल व्हावे, असाही आदेश चौताला यांना देण्यात आला आहे.