मुक्त विचारांची भूमी मानली जाणाऱ्या अमेरिकेत एक पोलिस अधिकाऱ्याच्या लैंगिकतेवर ठपका ठेवत त्याला प्रमोशन नाकारण्यात आल्याची घटना घडली आहे. यासंबंधी या पोलीस अधिकाऱ्याने पोलीस खात्याविरोधात खटला दाखल केला आहे. या पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या पोलीसदलातल्या उत्तम कामगिरीबाबत अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. तरीही फक्त त्याच्या लैंगिकतेमुळे त्याला हे प्रमोशन नाकारण्यात आलं आहे.

अमेरिकेतल्या मिसुरी राज्यातल्या सार्जंट कीथ विल्डहेबर या पोलीस अधिकाऱ्याने हा खटला दाखल केला आहे. १९९४ साली पोलीसदलामध्ये रूजू झालेल्या कीथ ने आपल्या चांगल्या कामाच्या आधारावर अनेकदा प्रमोशन्स मिळवली. १९९८ साली सार्जंट कीथने आग लागलेल्या कारमध्ये अडकलेल्या एका माणसाला स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवल्याबद्दल त्याला शौर्यपुरस्कार देण्यात आला होता. पोलीस दलामधल्या त्याच्या कामाचा रेकाॅर्ड नेहमीच उत्तम राहिला आहे.

पण असं असतानाही त्याला फक्त तो ‘गे’ आहे या कारणासाठी यापुढचं प्रमोशन नाकारण्यात आलंय. सार्जंट कीथना हे अधिकृतरीत्या सांगितलेलं नाही, पण सारासिनो नावाच्या त्यांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना हे तोंडी सांगितल्याचं सार्जंट कीथ यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. ‘तुम्ही गे असल्याचं पोलीस दलातल्या तुमच्या सहकाऱ्यांना आवडत नाहीये. त्यामुळे तुम्ही ‘गे’ होणं कमी केल्यााशिवाय तुम्हाला हे प्रमोशन मिळणार नाही’ असं सारासिनो या अधिकाऱ्याने आपल्याला सांगितलं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

लैंगिकता किंवा समलैंगिकता हा कोणी ठरवून घेतलेला निर्णय नसतो. निसर्गत:च ते ठरतं. अशा वेळी ”गे’ होणं कमी करा’ असं म्हणणं हा शुध्द मूर्खपणा आहे.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अमेरिकेत संकुचित विचारसरणी पुन्हा मूळ धरू लागली आहे. यामध्ये वंशवाद, धर्मवाद पुन्हा उफाळून वर आला आहेच. पण स्त्रियांचा दु:स्वास करणं, त्यांना कमी लेखणं यासारख्या अतर्क्य गोष्टीही पुन्हा व्हायला लागल्या आहेत. समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांबाबत असणारी सहिष्णुताही दिवसेंदिवस कमी होते आहे. यासारखी संकुचित विचारसरणी अमेरिकेत नव्हती असं कधीच नव्हतं पण ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर या विचारसरणीचे पडसाद अमेरिकेत उघडउघडपणे आणि बेमुर्वतखोरपणे मोठ्या प्रमाणावर उमटायला लागले आहेत. सार्जंट कीथ विल्डहेबर सारख्या शौर्यपदक विजेत्या पोलीस अधिकाऱ्याला फक्त त्याच्या लैंगिकतेमुळे प्रमोशन नाकारणं हा त्याच विचारसरणीचा एक भाग आहे.