अमेरिकी अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेल्या हिलरी क्लिंटन या पहिल्या महिला असून त्यांच्या विजयाच्या दृष्टिकोनातून भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक महत्त्वाचे मतदार आहेत. त्यांना मतदानात उतरवावे लागेल, असे क्लिंटन यांच्या भारतीय वंशाच्या समर्थकांनी म्हटले आहे.

भारतीय वंशाचे अमेरिकी फ्रँक इस्लाम हे क्लिंटन यांच्या प्रचार मोहिमेतील निधी संकलक असून त्यांनी सांगितले, की या निवडणुकीत भारतीय वंशाच्या अमेरिकी लोकांचा योग्य तो वापर मतदानात करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना जागते केले पाहिजे. ओहिओ, पेनसिल्वानिया, फ्लोरिडा व व्हर्जिनिया या राज्यांमध्ये त्यांना मतदानात सहभागी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर मतदानाला गेले तर भारतीय वंशाचे अमेरिकी लोक मोठा फरक घडवून आणू शकतात. इस्लाम हे फिलाडेल्फिया येथे झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार निवडीवर शिक्कामोर्तबीसाठीच्या अधिवेशनास उपस्थित होते. भारतीय वंशाचे अमेरिकी लोक वर उल्लेख केलेल्या राज्यात मतदानाला उतरले, तर क्लिंटन यांच्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात.

डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधी असलेले भारतीय अमेरिकी पलनियप्पन अँडीयाप्पन यांनी सांगितले, की क्लिंटन अध्यक्ष झाल्या तर त्या भारत व अमेरिका यांच्यातील संबंध एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू शकतात. त्या भारताच्या समर्थक असून ओबामा यांचेच भारतविषयक धोरण चालू ठेवतील. मैत्रीचे पूल बांधताना त्या लोकांची एकजूट करू शकतील.

शीख समुदायातील नेते राजवंत सिंग यांनी सांगितले, की हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी हा अमेरिकेतील एका प्रमुख पक्षाने शक्तिशाली महिलेच्या हातात देशाची सूत्रे देण्याचा महत्त्वाचा संदेश आहे. त्यांचा एकतेचा संदेश अनेक अमेरिकी लोकांना रुचला आहे. ९/११ हल्ल्यानंतर त्या आव्हानात्मक काळात शिखांच्या पाठीशी होत्या व शिखांना लक्ष्य केले जाऊ नये, असे त्या वेळी त्यांनी म्हटले होते.