अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील आठवणी पुस्तकरूपाने प्रकाशित होणार आहेत. परराष्ट्रमंत्री असताना पेललेली आव्हाने, आलेल्या अडचणी, केलेली कामे याबाबत हिलरी या पुस्तकात माहिती देणार आहेत, अशी माहिती पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या ‘सिमन अँड स्कुस्टर’ कंपनीने बुधवारी दिली.
या पुस्तकाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर प्रकाशन कंपनीने याबाबत माहिती दिली. या संकेतस्थळावरून या पुस्तकाच्या प्रती मागवू शकता, त्यासाठी २५.८० डॉलर मोजावे लागतील, असेही या संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे. १० जून रोजी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात हिलरी यांनी परराष्ट्रमंत्रिपद सांभाळले होते. या स्मरणिकेत त्याबाबतचा अनुभव सांगण्यात आलेला आहे. सीरियाचा मुद्दा, क्रिमीया, हवामान बदल आदी मुद्दय़ांवरही हिलरी यांनी या पुस्तकातून प्रकाशझोत टाकलेला आहे. २१व्या शतकातील आव्हाने कशा प्रकारे पूर्ण केली जाऊ शकतात, याबाबत विचारविनिमयही या पुस्तकातून करण्यात आलेला आहे.