हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्याविरोधात प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. मुलीच्या विवाहाच्या वेळीच वीरभद्र सिंह यांची सीबीआयने कसून चौकशी केली होती. हा प्रकार अमानवीय व सूडाच्या राजकारणाचे टोक गाठणारा असल्याची टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी आता मात्र वीरभद्र सिंह यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी वीरभद्र सिंह यांची सहा कोटी रुपयांची कथित विमा पॉलिसी व दिल्लीच्या महरौली परिसरातील फार्म हाऊस जप्त करण्याची तयारी ईडीने केली आहे. वीरभद्र सिंह यांच्यावर गेल्या सव्वा वर्षांत सीबीआयने एफआयआर दाखल केला नव्हता. आता मात्र ईडीनेदेखील तक्रार केली आहे.

जमीन अधिग्रहण विधेयक तसेच ललित मोदी प्रकरणावरून सत्ताधारी भाजपला सळो की पळो करून सोडणाऱ्या काँग्रेसला वीरभद्र सिंह यांच्यावरील कारवाईमुळे मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसची कोंडी करण्यासाठीच याप्रकरणी तपासकामास गती आली आहे. सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर आता चौकशीसत्र सुरू झाले आहे.

अधिवेशनापूर्वी कारवाई?

ईडीने सीबीआयकडे एफआयआरची प्रत मागितली आहे. ही प्रत मिळाल्यानंतर वीरभद्र सिंह यांच्याविरोधात कठोर कारवाईस सुरुवात होईल, असा दावा सूत्रांनी केला. त्यानंतर वीरभद्र सिंह यांच्या सर्व निवासस्थानी धाड टाकण्यात येईल. सहा कोटी रुपयांची विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी वीरभद्र सिंह यांनी आनंद चौहान नामक विमा एजंटच्या खात्यावर पाच कोटी रुपये

जमा केले होते. याशिवाय सात कोटी रुपयांच्या फार्म हाऊसची खरेदी रोख रक्कम देऊन त्यांनी केली होती. आयकर विवरणात या दोन्हींचा उल्लेख नव्हता. २०१०च्या खरेदीचे सुधारित विवरण वीरभद्र सिंह यांनी २०१३मध्ये सादर केले. याप्रकरणी आयकर खात्याने संबंधित विभागाच्या व्यक्तींची चौकशी केली आहे. आता ईडीनेदेखील चौकशीचा फास आवळला आहे.

हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी वीरभद्र सिंह यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोध करणे काँग्रेसला जड जाईल.

हिमाचल प्रदेशात  काँग्रेसचे आमदार संपर्कात: शर्मा

शिमला: हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांच्या कारभारावर काँग्रेसचे अनेक आमदार नाराज असून ते आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपने शनिवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार वीरभद्रसिंह यांच्याविरुद्ध राजकीय सुडाचे राजकारण करीत असल्याची तक्रार हिमाचल प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्ष आणि राज्यातील नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केल्यानंतर भाजपने हा दावा केला आहे.

वीरभद्रसिंह यांच्या निवासस्थानांवर सीबीआयने छापे टाकल्यानंतर काँग्रेस सरकारची स्थिती दोलायमान झाली आहे. काँग्रेसचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे राज्य सरचिटणीस रणधीर शर्मा यांनी केला आहे.

काँग्रेसचे कोणते आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांची नावे सांगणे  योग्य नाही. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक सोमवारी होणार असून त्यामध्ये राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.