मध्यम तीव्रतेच्या भूकंप मालिकेत हिमाचल प्रदेशला सकाळी हादरे बसले. त्यानंतर घाबरलेल्या लोकांनी घरातून पळ काढला. सिमला व कुलू जिल्हय़ात लोक घराबाहेर पळाले. सकाळी ६.४६, ७.०५, ९.०२ या वेळेला अनुक्रमे ४.६, ४.३, ४.२ रिश्टर तीव्रतेचे धक्के बसले, असे स्थानिक हवामान खात्याचे संचालक मनमोहन सिंग यांनी सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू कुलू येथे १० कि.मी. खोलीवर होता. सिमला जिल्हय़ातील रामपूर व कुलू जिल्हय़ात १५ धक्के बसले. लोक घरात जायला घाबरत होते. कुलू, किंगल कुमारसेन भागातील अनेक इमारतींना तडे गेले आहेत. कुलू व रामपूरमध्ये मालमत्तेचे बरेच नुकसान झाले असले तरी प्राणहानीचे वृत्त नाही, असे रामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी निशांत ठाकूर यांनी सांगितले. शैक्षणिक संस्था खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आल्या आहेत. मोकळय़ा जागेत तंबू लावण्यात आले असून, लोक घरात जायला घाबरत आहेत. शाळेच्या आवारातील एक वृक्ष उन्मळून पडला. भूकंपाच्या धक्क्यानंतर लोक कामावर जाण्यासही घाबरत होते. सोलान, चौपाल व सिरामोर जिल्हय़ात भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत. भूकंपाच्या धक्क्यांनी मान्सूनच्या पावसाने खिळखिळी झालेली माती ढिली होऊन दरडी कोसळण्याची शक्यता आहे.

 

सौराष्ट्रला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही

अहमदाबाद: सौराष्ट्रला शनिवारी भूकंपाचा धक्का बसला, मात्र त्यामुळे कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही. रिक्टर स्केलवर या भूकंपाची क्षमता ३.८ इतकी होती. भूकंपाच्या धक्क्य़ामुळे परिसरात घबराट पसरली होती. जुनागड जिल्ह्य़ातील मंगरोळ किनाऱ्यावर अरबी समुद्रात ३०० कि.मी.वर या भूकंपाचा केंद्रिबदू होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमाराला भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर सात मिनिटांनीही धक्के जाणवत होते.

भूकंपाचा केद्रिबदू अरबी समुद्रात असल्याने जमिनीवर या भूकंपाचा विशेष परिणाम जाणवला नाही. या भूकंपामुळे मंगरोळ, जुनागड शहर आणि नजीकच्या जिल्ह्य़ांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.