अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सव्वा महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारतीय वंशाच्या मतदारांना साद घातली आहे. हिंदू समाजाने अमेरिकेच्या तसेच जगाच्या संस्कृतीमध्ये अमूल्य योगदान दिले आहे असे सांगत ट्रम्प यांनी हिंदूंना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटीक पक्षाच्या हिलेरी क्लिंटन यांच्यात काँटे की टक्कर रंगली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. १५ ऑक्टोबररोजी न्यूयॉर्कमध्ये रिपब्लिकन हिंदू युती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत भारतीयांनी सहभागी व्हावे यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न सुरु आहेत. हिंदूंना आकर्षित करण्यासाठी ट्रम्प म्हणाले, अमेरिकी संस्कृती आणि जागतिक नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये हिंदू समाजाने सुंदर योगदान दिले आहे. दोन्ही देशांमधील मुक्त व्यवसाय धोरण, कामाची चिकाटी आणि प्रेम, कौटुंबिक मूल्यांवरील निष्ठा या समान धाग्यांचा गौरव केला गेला पाहिजे, असे आपल्याला वाटते, असेही त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी २४ सेकंदाचा एक व्हिडीओ देखील अपलोड केला आहे. या व्हिडीओत ट्रम्प म्हणतात, रिपब्लिक हिंदू युती मेळाव्यात तुम्हाला निमंत्रित करताना मला आनंद होतो. या मेळाव्यात हजारो भारतीय अमेरिकी मंडळींशी बोलता येईल आणि याचा फायदा शेवटी अमेरिकेला होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. दिवसभर चालणा-या या मेळाव्यात बॉलिवूडचे कलाकार, गायक, डान्सर सहभागी होतील. याशिवाय हिंदू धर्मगुरु आणि नेतेही यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

इस्लामिक दहशतवादाचे बळी पडलेल्यांना या मेळाव्यातून फायदा होईल असे या कार्यक्रमाच्या आयोजकांचे म्हणणे आहे. भारतीय अमेरिकन शाली कुमार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शाली कुमार हे ट्रम्प यांच्या आशिया पॅसिफिक विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य आहे. या कार्यक्रमात सुमारे १० हजार जण हजर राहतील असा आयोजकांचा अंदाज आहे. गेल्या दोन निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराने भारतीयांच्या कार्यक्रमात हजर राहण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांची संख्या कमी आहे. पण व्हर्जिनिया सारख्या राज्यांमध्ये चुरशीची लढत झाल्याने भारतीय वंशाच्या मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरेल. त्यासाठी ट्रम्प यांनी ही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार हिलेरी क्लिंटन यांनीदेखील भारतीय वंशाच्या नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये वेळोवेळी उपस्थिती दर्शवली आहे.