मध्य बांगलादेशमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी शनिवारी एका हिंदू शिंप्यावर कुऱ्हाडींनी वार करून त्याच्या दुकानातच त्याची निर्घृण हत्या केली. या मुस्लीमबहुल देशात बुद्धिजीवी, कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक यांच्यावरील निर्दयी हल्ल्यांच्या मालिकेतील ही सगळ्यात अलीकडील घटना आहे.
तंगैल जिल्ह्य़ाच्या गोपालपूर उपजिल्ह्य़ांतर्गत येणाऱ्या दुबैल खेडय़ाचा रहिवासी असलेला निखिलचंद्र जोरदर (५०) याचे दुकान त्याच्या घरीच आहे. दुपारी तीन हल्लेखोर त्याच्या घरात शिरले आणि त्यांनी निखिलचा गळा चिरला. हत्यानंतर हल्लेखोर लगेच एका मोटारसायकलवरून पळून गेले, अशी माहिती गोपालपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी मोहम्मद अब्दुल जलील यांनी दिल्याचे ‘ढाका ट्रिब्यून’ने म्हटले आहे.
इस्लामिक स्टेटने (आयसिस) या हत्येची जबाबदारी स्वीकारली असल्याचे अमेरिकेतील ‘साइट’ या खासगी गुप्तचर गटाने म्हटले आहे.
या हत्येमागील उद्देश काय असावा, असे विचारले असता जलील यांनी सांगितले, की इस्लामच्या प्रेषिताविरुद्ध ‘मानहानीकारक’ वक्तव्य केल्याबद्दल निखिलविरुद्ध २०१२ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हय़ात त्याला तीन महिन्यांच्या कैदेची शिक्षा देण्यात आली होती.