शून्याचा शोध भारतात आपण मानतो त्यापेक्षाही आधीच्या काळात लागला होता, असे प्राचीन भारतीय हस्तलिखितावरून स्पष्ट झाले आहे. हे हस्तलिखित तिसऱ्या शतकातील आहे. तेव्हापासून शून्याचा वापर सुरू होता हे लक्षात आल्याने गणिताचा इतिहास ५०० वर्षांनी मागे सरकला आहे, असे ऑक्सफर्डच्या संशोधकांनी म्हटले आहे. आताच्या आपल्या कल्पनेपेक्षा किमान पाचशे वर्षे आधी भारतात शून्याचा शोध लागला होता.

बाखशाली हस्तलिखित हे १८८१ मध्ये भारतातील बाखशाली खेडय़ात एका शेतात सापडले होते. आता हे गाव पाकिस्तानात आहे तर हे हस्तलिखित १९०२ पासून ब्रिटनच्या बोडलियन वाचनालयात आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी कार्बन डेटिंग तंत्राचा वापर करून बाखशाली हस्तलिखितानुसार शून्याचे मूळ फार जुने असल्याचे स्पष्ट केले आहे. हे हस्तलिखित तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील आहे. त्यात शून्याचा वापर केलेला आहे. बाखशाली हस्तलिखित हे ८ व्या व १२ व्या शतकातील असावे असा आधीचा अंदाज होता. पण नवीन कार्बन डेटिंग तंत्राच्या मदतीने ते त्यापेक्षा जुने असल्याचे दिसून आले आहे. हे हस्तलिखित ‘बिर्च बार्क’ वर लिहिलेली ७० पाने असून त्यात तीन वेगवेगळ्या शतकातील साधनांचा वापर केला आहे त्यामुळे त्याचा काळ ठरवणे अवघड होते.

गणिताचा इतिहास आणखी जुना

बोडलियन ग्रंथालयाचे रिचर्ड ओव्हेनडेन यांनी सांगितले, की बाखशाली हस्तलिखिताचा कालावधी निश्चित झाल्याने गणिताचा इतिहास आणखी जुना झाला आहे. बाखशाली हे गणितातील सर्वात जुने हस्तलिखित मानले जाते. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या मंदिरातील भिंतीवर नवव्या शतकात शून्याचे चिन्ह कोरलेले दिसून आले होते. बाखशाली हस्तलिखितात जे बिंदू वापरले आहे ते शून्याचे निदर्शक आहेत. माया व बॅबिलोनियन संस्कृतीतही शून्याचा वापर झालेला होता. ऑक्सफर्ड विद्यापीठातील गणिताचे प्राध्यापक मार्कुस डय़ू सॉटॉय यांनी सांगितले, की शून्याची निर्मिती ही तिसऱ्या शतकापासून सुरू झाली, त्या वेळीच भारतीयांनी ही कल्पना मांडली होती व नंतर ती आधुनिक जगाने उचलली. यातून प्राचीन काळापासून भारतीय उपखंडात गणिताची प्रगती किती मूलभूत पातळीवरून होत गेली हे दिसून येते.