हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी याचा खात्मा झाल्यानंतर त्याचे वडील मुजफ्फर वानी हे भारताविरुद्ध उभे राहिले आहेत. इतकेच नाही तर काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्यासाठी आपल्या एकुलत्या एक मुलीला दहशतवादी बनवण्यासही ते तयार झाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आता मुजफ्फर वानी हे तेथे सुरु असलेल्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनले आहेत. त्यांनी शुक्रवारी पम्पोर येथे घेतलेल्या या सभेला हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती. या सभेचे आयोजन हुरियत संघटनेच्या नेत्यांनी केले असल्याचे कळते.
काश्मीरमध्ये नुकतीच एक वेगळी संघटना तयार झाली आहे. यात सय्यद अली शाह गिलानी, मीरवाज उमर, फारुख आणि यासीन मलिक यांचा समावेश आहे. सदर सभेस ‘दरगाह चलो’ असे नाव देण्यात आले होते. जर काश्मीर खो-यात संचारबंदी लागू नसती तर या सभेला अजून गर्दी होण्याची शक्यता होती. पण संचारबंदी सुरु असल्यामुळे लोकांना सभेच्या ठिकाणी जाता आले नाही. सभेत लोकांना संबोधित करताना मुजफ्फर म्हणाले की, भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरकरिता लढण्यासाठी मी माझी एकुलती एक मुलगीदेखील पाठवायला तयार आहे. तसेच या लढ्यात माझ्या दोन्ही मुलांना गमवल्याचे मला अजिबात दुःख नाही, असेही ते म्हणाले. बुरहान वानीचा भाऊ खालिद याचा २०१० साली झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला होता.
बुरहानच्या मृत्यूनंतर काश्मीर खो-यातील वातावरण अद्याप चिघळलेले आहे. तेथे आतापर्यंत ५१ लोकांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या हजारच्याही वर गेली आहे. यात पोलीस आणि सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे.  बुरहान वानीच्या दफनविधीला २० हजारपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहिले होते.