सबझारच्या अंत्ययात्रेत हजारोंची उपस्थिती; ‘बंद’चे आवाहन धुडकावून तरुण लष्कराच्या परीक्षेत सहभागी

हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी सबझार भट याला सुरक्षा दलांनी ठार मारल्यानंतर राज्यात अशांततेचे संकट उद्भवू शकते अशा भीतीपोटी अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी रविवारी काश्मीर खोऱ्यातील बहुतांश भागांत संचारबंदीसदृश र्निबध लागू केल्यामुळे काश्मीरमधील परिस्थिती तणावाची, परंतु नियंत्रणाखाली होती. सबझारच्या अंत्ययात्रेत हजारो नागरीक सहभागी झाले होते.

परिस्थती तणावाची असतानाही काश्मिरातील ८०० तरुणांनी लष्कराच्या सामायिक प्रवेश परीक्षेत भाग घेतला. तिकडे पाकिस्तानने त्याच्या कुरापती सुरूच ठेवत केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात लष्कराचा एक हमाल ठार झाला. दरम्यान, काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करावी अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केली आहे.

सध्याची कायदा व सुव्यवस्था स्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरमधील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत र्निबध लागू करण्यात आले. रविवारी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे हेच कर्फ्यू पास मानले गेले. श्रीनगरमधील सर्व महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळा सोमवारी बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा व शोपियान जिल्हे, उत्तर काश्मीरमधील त्राल शहर, तसेच मध्य काश्मीरमधील बडगाम व गंडेरबल जिल्ह्य़ांमध्ये लोकांच्या हालचालींवर र्निबध लागू करण्यात आले आहेत. त्राल येथे शनिवारी हिज्बुलचे २ दहशतवादी मारले गेल्यानंतर उसळलेला हिंसाचार पसरू नये यासाठी हे र्निबध घालावे लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुलवामा, कुलगाम, शोपियान व सोपोर येथे दगडफेकीच्या काही घटना वगळता काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती शांततापूर्ण होती.

शस्त्रसंधीचा भंग

  • ’काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानने शनिवारी शस्त्रसंधीचा भंग करून अकारण गोळीबार केला. यात लष्कराचा एका हमाल ठार झाला, तर दुसरा जखमी झाला. हमालाचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी सोपवण्यात आला असून, जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • ’पूंछ जिल्ह्य़ात नियंत्रण रेषेनजिक रविवारी भारतीय सैनिकांनी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमनारास एका घुसखोराला गोळ्या घालून ठार केल्याचे लष्कराने सांगितले.

‘बंद’चा परिणाम

  • ’फुटीरतावादी नेत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे काश्मीर खोऱ्यातील सामान्य जनजीवनावर परिणाम झाला. दरम्यान, मारला गेलेला हिज्बुलचा ‘कमांडर’ सबझार भट याचा मृतदेह रविवारी त्रालमधील रात्सुना भागातील कब्रस्थानात दफन करण्यात आला.
  • ’जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख मो. यासीन मलिक याला श्रीनगरमधील मैसुमा भागातील त्याच्या घरून अटक करण्यात येऊन मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले. त्याने शनिवारी हिज्बुलचे ठार झालेले दहशतवादी सबझार भट व फैझान मुझफ्फर यांच्या घरी भेट दिली होती.
  • ’हिज्बुलच दहशतवादी ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात नव्याने निदर्शने सुरू झाली असतानाही आणि फुटीरतावाद्यांचे ‘बंद’चे आवाहन धुडकावून लावत काश्मिरातील सुमारे ८०० तरुण रविवारी लष्कराच्या सामायिक प्रवेश परीक्षेत सहभागी झाले.
  • ’ज्युनियर कमिशण्ड ऑफिसर आणि इतर पदांवर निवडीसाठी पाटण व श्रीनगर येथे झालेल्या या परीक्षेत ७९९ उमेदवारांनी भाग घेतल्याचे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
  • ’उज्ज्वल भविष्य निवडण्यासाठी तरुणांनी बंदचे आवाहन स्पष्टपणे धुडकावून लावल्याचे यातून दिसून आले. यापूर्वी शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी उत्तीण केलेल्या ८१५ पैकी फक्त १६ तरुण लेखी परीक्षेसाठी आले नाहीत, असे हा अधिकारी म्हणाला.