पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये सीमेनजीक नव्याने शस्त्रसंधीचा भंग केल्यामुळे उद्भवलेल्या एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली.
ही उच्चस्तरीय बैठक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या उपस्थितीत नॉर्थ ब्लॉकमधील गृहमंत्रालयात झाली. गेल्या दोन दिवसात सुरक्षेबाबत तसेच राजनैतिक आघाडीवर झालेल्या वेगवान घडामोडी यातून उद्भवलेल्या स्थितीचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी सिंह यांनी ही बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली.  सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक डी.जी. पाठक यांनीही डोवल यांची दिवसा भेट घेऊन त्यांना सीमेनजीकच्या वस्तुस्थितीची माहिती दिली, असेही सूत्रांनी सांगितले. भारतीय व पाकिस्तानी पंतप्रधानांनी रशिया भेटीत पुन्हा चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच या ताज्या घडामोडी घडल्या आहेत. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा भंग केल्याचा आरोप एकमेकांवर केला असून, परस्परविरोधात निषेधही नोंदवला आहे.