पाकिस्तानकडून मोबाईल अॅपच्या माध्यमातून हेरगिरी केली जात असल्याचे भारतीय गृह मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मोबाईलमधील चार अॅप्स डिलीट काढण्याचे आवाहन गृह मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून मालवेअरचा वापर करत पाकिस्तानकडून हेरगिरी केली जात असल्याचे गृह खात्याच्या निदर्शनास आल्याने काही अॅप डिलीट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मालवेअरचा आधार घेत मोबाईल ऍपमधील वापरकर्त्याची माहिती काढून घेतली जाते आहे, अशी माहिती गृहखात्याला मिळाली आहे. हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानच्या यंत्रणांकडून हा सर्व प्रकार केला जात असल्याचे गृह खात्याने सांगितले आहे. त्यामुळे टॉप गन (गेम अॅप), एमपीजंक (म्युझिक अॅप), व्हिडीजंक (व्हिडीओ अॅप) आणि टॉकिंग फ्रॉग (एन्टरटेन्मेंट अॅप) हे चार अॅप वापरकर्त्यांनी तातडीने स्मार्टफोनमधून डिलीट करावेत, असे आवाहन गृह खात्याकडून करण्यात आले आहे.

‘मालवेअरचा वापर करत अॅपच्या माध्यमातून भारतीयांच्या मोबाईलमधील माहिती चोरण्याचा आणि त्या माहितीचा वापर हेरगिरी करण्याचा उद्योग पाकिस्तानकडून केला जातो आहे. संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी पाकिस्तानी यंत्रणांकडून मालवेअरचा आधार घेतला जातो आहे. टॉप गन, एमपीजंक, व्हिडीजंक आणि टॉकिंग फ्रॉग या अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून पाकिस्तानकडून हेरगिरी केली जाते आहे,’ असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सध्या देशभरात ऑनलाईन पेमेंट आणि इंटरनेट बँकिंगचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मालवेअरच्या माध्यमातून सायबर गुन्हेदेखील घडवले जाऊ शकतात. त्यामुळेच टॉप गन, एमपीजंक, व्हिडीजंक आणि टॉकिंग फ्रॉग हे चार अॅप डिलीट करण्याचे आवाहन गृह मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

मालवेअरचा वापर एखाद्याच्या मोबाईलमधील संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. यासाठी व्हायरसचा वापर करुन स्मार्टफोन वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय त्याची माहिती त्याच्या स्मार्टफोनमधून गोळा केली जाते.