फाशीची शिक्षा झालेल्या दोषींना दया मिळू नये यासाठी केंद्र सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. फाशीच्या शिक्षेच्या रांगेत असलेल्या पाच दोषींच्या दयेचे अर्ज केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी फेटाळले. त्यात महाराष्ट्रात गाजलेल्या गावित भगिनींच्या अर्जासहित राजेंद्र वासनिक याच्या अर्जाचाही समावेश आहे. याखेरीज, निठारी बलात्कार व हत्याप्रकरणी सुरेंद्र कोळी, मध्य प्रदेशातील जगदीश आणि आसाममधील होलीराम बोडरेलोई यांचेही दयेचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. या सर्व दोषींनी दयेसाठी केलेले अर्ज फेटाळण्यात यावेत, अशी स्पष्ट शिफारस करून गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यासंबंधीची फाइल राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडे पाठवून दिली.
१९९० ते १९९६ या कालावधीत सीमा व रेणुका या भगिनींनी आपली आई अंजनाबाई गावित व रेणुकाचा पती किरण शिंदे याच्या मदतीने १३ बालकांचे अपहरण केले. त्यापैकी नऊ जणंची हत्या केल्याच्या आरोप ठेवण्यात आल्यानंतर सीमा व रेणुका यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. महाराष्ट्रातील आसरा या गावी एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्दयपणे हत्या केल्याप्रकरणी राजेंद्र वासनिक याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.