गुजरात दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नोटाबंदी व जीएसटीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदींनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर काही वेळातच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नोटाबंदीचा हा निर्णय म्हणजे ‘गुन्हेगारी कृत्य’ असल्याचे म्हटले होते, अशी आठवण राहुल यांनी या वेळी करून दिली. राजकोट येथे व्यापारी प्रतिनिधींसमोर ते बोलत होते. भारतात प्रामाणिक नेता होणे कठीण काम असल्याचं सांगत प्रामाणिक नेत्याला खूप भोगावं लागतं, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

या दौऱ्याच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजवला आहे. व्यापाऱ्यांसमोर बोलताना त्यांनी नोटाबंदी, रोजगार आणि जीएसटीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला. सरकारने जीएसटी लागू करण्यापूर्वी कोणतीच तयारी केली नव्हती, असा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे गुजरातच्या व्यापाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मोठ्याप्रमाणावर जीएसटीचा विरोध केला होता.

भारतात सर्वांत कठीण काम म्हणजे प्रामाणिक नेता होणे आहे. एका प्रामाणिक नेत्याला खूप काही भोगावं लागतं आणि याचा मला अनुभव आहे, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी प्रत्येक वर्षी २ कोटी रोजगार देण्याचे वचन दिले होते. पण त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही. रोजगार हा छोट्या, मध्यम क्षेत्रातील उद्योगातून येतो. पण या सरकारचे केवळ ५-१० औद्योगिक घराण्यांकडेच लक्ष असल्याचा आरोप केला.

तत्पूर्वी, गुजरातमध्ये नर्मदा नदीजवळ उभारण्यात येणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. सरदार पटेल यांचा पुतळा चीनमध्ये तयार होत असून त्यामागे ‘मेड इन चायना’ असा शिक्कादेखील आहे. देशासाठी ही बाब लाजिरवाणी असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला.जामनगरमध्ये संबोधित करताना राहुल गांधी गुजरात सरकारवर बरसले. गुजरातमधील विद्यमान सरकार हे रिमोट कंट्रोलने चालते, दिल्लीतून हा रिमोट ऑपरेट केला जातो. राज्यातील सरकार हे दिल्ली नव्हे तर गुजरातमधूनच चालवणे गरजेचे आहे असा चिमटा त्यांनी भाजपला काढला.