अमेरिकेतील एका उपहारगृहात काम करणाऱ्या महिलेने नित्यनेमाने उपहारगृहात येणाऱ्या ग्राहकाला आपली एक किडनी दान केली. महिलेचे नाव मारियाना विलारिअल असे असून, ती अमेरिकेतील हूटर्स नावाच्या उपहारगृहात वेटरचे काम करते. जॉर्जिया राज्यातील रॉसवेल येथे असलेल्या या उपहारगृहाचे डॉन थॉमस १० वर्षांपासून ग्राहक आहेत. मारियानाची किडनी डॉनसाठी योग्य असल्याचे सिद्ध झाल्यावर २९ मे रोजी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मारियानाच्या या निस्वार्थी कार्याचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत असून, इंटरनेटवर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मारियानानेदेखील किडनी मॅच झाल्याचे सांगत इन्स्टाग्रामवरून लोकांचे आभार मानले आहेत. किडनीच्या त्रासामुळेच आजीला गमवावे लागलेल्या मारियानाने डॉन या आपल्या ग्राहकाला मदतीचा हात पुढे केला. आपण आजीसाठी काही करू शकलो नाही, परंतु डॉन आणखी दोन वर्षे आयुष्याची मजा लुटू शकल्यास आपल्यासाठी ही आनंदाची बाब असेल अशी भावना तिने व्यक्त केली.
(सौजन्य http://www.mirror.co.uk)