फिलिपिन्सची वुर्टचबॅख खरी विश्वविजेती
विश्वसुंदरी २०१५ या सौंदर्य स्पर्धेत यजमान स्टीव्ह हार्वे यांनी चुकून मिस कोलंबिया हिला विजेती घोषित केले, प्रत्यक्षात ती उपविजेती आहे. पिया अलोंझो वुर्टचबॅख या फिलिपिन्सच्या युवतीने जगातील ८० युवतींना मागे टाकून विश्वसुंदरी २०१५ स्पर्धा जिंकली आहे. हार्वे यांनी लगेच त्यांची चूक सुधारली
त्यांनी लासव्हेगास येथे खच्चू भरलेल्या स्पर्धेच्या ठिकाणी सांगितले, की ‘‘माझी चूक झाली, जरा गोंधळ झाला आहे. कार्डवर नेमके नाव काय आहे ते मी सांगतो. जी चूक झाली ती माझी जबाबदारी आहे.’’ मिस कोलंबिया अरियाडना गुटीरेझ हिने विजयाचा मुकुट चढवला गेल्यानंतर कोलंबियाचा ध्वज फडकावला, स्मितहास्य केले व प्रेक्षकांना अभिवादनही केले. नंतर हार्वे पुन्हा मंचावर आले व वुर्टचबॅख हिला काय करावे ते समजेना. तिचे नाव पुकारले गेले व नंतर गुटीरेझ हिचा मुकुट काढून तो तिच्या डोक्यावर ठेवण्यात आला. हार्वे यांनी ट्विटवर माफी मागितली पण त्यांनी त्यातही कोलंबिया व फिलिपिन्स यांची स्पेलिंग चुकीची लिहिली होती नंतर त्यांनी तो संदेश काढून टाकला. हार्वे यांनी लिहिले आहे, की ती रात्र मी कधीही विसरणार नाही, अनेक सुंदर युवती या स्पर्धेत होत्या. भारतीय सौंदर्यवती उर्वशी राउतेला हिला पहिल्या पंधरातही स्थान मिळवता आले नाही. यापूर्वी इ.स. २००० मध्ये विश्वसुंदरी स्पर्धा लारा दत्ता हिने जिंकली होती.