मध्य लंडनमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री उशिरा गॅसचा स्फोट होऊन १४ जण जखमी झाले . पोर्टमन स्क्वेअर येथील द चर्चिल हिजन्सी लंड या हॉटेलमध्ये ही आग लागली.  जखमींवर उपचार सुरू आहेत. गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचे समजते. पाच रुग्णवाहिकांनी रुग्णांना रुग्णालयात हलवले.

चीनमध्ये ६९०० विहिरी बंद करणार
बीजिंग- बीजिंगच्या नागरी पाणीपुरवठा विभागाने तीन चतुर्थाश शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ६९०० विहिरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या विहिरी पाच वर्षांत बंद करण्यात येणार आहेत. भूजलाची पातळी कमी होत चालल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या विहिरी २४ कोटी क्युबिक मीटर पाणी देतात असे बीिजगच्या पाणीपुरवठा विभागाचे उपप्रमुख झांग पिंग यांनी सांगितले.

रेणू खाटोर यांची नेमणूक
वॉशिंग्टन- फेडरल रिझर्व बँकेच्या डल्लास येथील संचालक मंडळावर भारतीय वंशाच्या अमेरिकी रेणू खाटोर यांची नेमणूक करण्यात आली आहे . त्यांनी ह्य़ूस्टन विद्यापीठाच्या अध्यक्ष म्हणून काम केले आहे व ह्यूस्टन विद्यापीठाच्या त्या पहिल्या परदेशी जन्मलेल्या कुलगुरू होत्या.

अमित मेहता यांची नियुक्ती
वॉशिंग्टन- अमेरिकी काँग्रेस समितीने भारतीय वंशाचे अमेरिकी वकील अमित प्रिवर्धन मेहता यांची वॉशिंग्टनचे जिल्हा न्याायाधीश म्हणून नेमणूक केली आहे. त्यांच्या नावाचा प्रस्ताव अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी मांडला होता. सिनेटच्या न्याय समितीने त्यांच्या नावाला मान्यता दिली आहे. वॉशिंग्टनचे ते पहिले आशियन-पॅसिफिक-अमेरिकन न्यायाधीश आहेत. जॉर्जटाऊन विद्यापीठ व व्हर्जिनिया स्कूल ऑफ लॉ येथून त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती.

तीन मुले मृत्युमुखी
मीरत- येथील झकीर वसाहतीत काही म्हशी एकमेकांवर धावून गेल्याने आवाराची भिंत कोसळून बाजूला खेळत असलेली तीन मुले मरण पावली. दोन म्हशी एकमेकांवर धावल्याने इतर म्हशींमध्येही धावपळ झाली त्यात ही भिंत पडली.

केनियात २८ ठार
नैरोबी- उत्तर केनियात सोमालियाच्या अल शबाब अतिरेक्यांनी एका बसचे अपहरण केले व नंतर मुस्लीम नसलेल्या २८ जणांना ठार केले त्यांना इतर प्रवाशांपासून वेगळे काढण्यात आले. या बसमध्ये ६० प्रवासी होते. ही बस राजधानी नैरोबीला जात होती.