ग्रामीण भारताच्या तुलनेत शहरी लोकांच्या दैनंदिन खर्चाचे प्रमाण ८४ टक्क्यांनी जास्त असल्याची बाब समोर आली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने देशातील नागरिकांच्या दैनंदिन खर्चाबद्दल सादर केलेल्या प्रबंधात ही बाब नमूद करण्यात आलीये. राष्ट्रीय सर्वेक्षण विभागाचे उपसंचालक मोनोजित दास यांनी या प्रबंधासाठी देशातील विविध धर्मांच्या नागरिकांच्या पैसे खर्च करण्याच्या सवयींचा अभ्यास केला होता. त्यामध्ये प्रत्येक समाजातील नागरिक पैसे खर्च करताना वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे.

मासिक दरडोई उत्पन्नाच्या आधारे (एमपीसीई) नागरिकांच्या जीवनशैलीचा दर्जा ठरवला जातो. त्यानुसार सध्या शहरी भागातील दरडोई खर्चाची रक्कम २,६३० इतकी आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत हे प्रमाण ८४ टक्क्यांनी जास्त आहे. ग्रामीण नागरिकांचा महिन्याचा दरडोई खर्च १,४३० इतका आहे.

८५ टक्के भारतीयांचा सरकारला पाठिंबा, २७ टक्के जनतेला हवंय खंबीर नेतृत्त्व

मात्र, मुस्लिम समाजाचा विचार करायचा झाल्यास ग्रामीण आणि शहरी नागरिकांच्या दैनंदिन खर्चातील तफावत कमी आहे. एकूण खर्चाचा विचार करता मुस्लिम नागरिक दैनंदिन खर्चाला कमी प्राधान्य देत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. तर हिंदू समाजातील शहरी आणि ग्रामीण नागरिकांच्या खर्चात सर्वाधिक म्हणजे ८४ टक्के तर ख्रिश्चन समाजातील नागरिकांच्या खर्चात ४७.३६ टक्के तफावत आढळून आली आहे. तसेच मुस्लिम समाजात गरिबीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या समाजातील नागरिक दैनंदिन खर्चापेक्षा खाण्याच्या गोष्टींवर अधिक पैसे खर्च करतात. दैनंदिन खर्चाचे प्रमाण जसजसे वाढत जाईल, तसतसे खाण्याच्या गोष्टींवरील खर्चाचे प्रमाण कमी होते, असा निष्कर्ष या प्रबंधात मांडण्यात आला आहे.ग्रामीण नागरिक खाण्याच्या गोष्टींवर सरासरी ५२.९ टक्के इतके पैसे खर्च करतात. ग्रामीण मुस्लिमांमध्ये हेच प्रमाण ५९.३ टक्के इतके आहे. तर शहरी भागातील मुस्लिम खाण्यावर साधारणत: ४९.५ टक्के इतके पैसे खर्च करतात. शहरी भागातील नागरिकांकडून खाण्याच्या गोष्टींवर साधारणत: ४२.६ टक्के खर्च केला जातो.