मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते झाले. यामुळे मुंबई-गुजरातमधील अंतर अवघ्या तीन तासांवर येणार आहे. या प्रकल्पासाठी १ लाख १० हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून पाच वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना बुलेट ट्रेन भारताला जवळपास मोफत मिळाली आहे, असे मोदींनी सांगितले. या प्रकल्पासाठी कर्जपुरवठा करणाऱ्या जपानचे पंतप्रधान आबेंचे मोदींनी आभारही मानले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन भारताला जवळपास मोफत मिळत असल्याचे सांगत मोदींनी उपस्थितांना त्याचे ‘गणित’ही समजावून सांगितले. ‘एखादी व्यक्ती कोणतीही वस्तू खरेदी करते, तेव्हा ती पै न पैचा हिशेब मांडते. एखाद्याला दुचाकी खरेदी करायची असेल, तरीही तो १० बँकांमध्ये जाऊन व्याजाचे दर कुठे कमी आहेत, याची चौकशी करतो. अर्धा टक्का कमी दराने कर्ज मिळाल्यावरही त्याला आनंद होतो,’ असे मोदींनी म्हटले. मोफत कर्ज देणारा एखादा मित्र किंवा बँक मिळेल का, असा सवाल विचारत मोदींनी या प्रकल्पामागील ‘गणित’ समजावून सांगितले. ‘८८ हजार कोटींचे कर्ज आणि तेही मोफत. असे कर्ज कोणता मित्र देईल? मात्र भारताला शिंजो आबे यांच्यासारखा मित्र मिळाला आहे. जपानने भारताला केवळ ०.०१ टक्के दराने कर्ज दिले आहे. त्यामुळे हा प्रकल्प एक प्रकारे मोफतच मिळणार आहे,’ असे मोदी म्हणाले.

यावेळी मोदींनी बुलेट ट्रेनची आवश्यकता आणि वाहतुकीचे देशाच्या विकासातील योगदान यावरही भाष्य केले. कोणत्याही देशाच्या विकासात तेथील वाहतुकीच्या साधनांचा मोठा वाटा असतो. वाहतूक व्यवस्थेचे देशाच्या विकासात मोठे योगदान असते. अमेरिकेतील विविध भागांमध्ये रेल्वेमार्ग पोहोचल्यावर समृद्धी आली. हा इतिहास आहे आणि हाय स्पीड रेल्वेमुळे युरोपपासून चीनपर्यंत आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन झाले, हे वर्तमान आहे,’ असे मोदी म्हणाले.