उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता दिल्ली महापालिका निवडणुकीतही भाजपने बाजी मारली आहे. महापालिका निवडणुकीत दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला नाकारत भाजपला साथ दिली आहे. सत्ताविरोधी वातावरण असूनही भाजपने दिल्ली महापालिकेतील सत्ता राखली आहे. यानंतर आम आदमी पक्षाने ईव्हीएमवर पराभवाचे खापर फोडले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी तब्बल ६७ जागा पटकावणाऱ्या आम आदमी पक्षाला महापालिकेत पराभव पत्करावा लागला आहे. आम आदमी पक्षाच्या पराभवाची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात येत आहे.

दिल्लीतील तीन महापालिकांसाठी २३ एप्रिलला मतदान झाले होते. यावेळी ५३.५८ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २०१२ च्या तुलनेत यंदा महापालिका निवडणुकीसाठी जास्त मतदान झाले होते. अनेकदा मतदानाची वाढलेली टक्केवारी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाते. मात्र भाजपने सत्ता राखत दिल्ली महापालिकेत विजयाची हॅट्रिक साजरी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी भाजपला शुभेच्छा देताना आम आदमी पक्षाची चेष्टा केली आहे.

गेल्याच महिन्यात भाजपने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दणदणीत विजय मिळवला होता. यासोबतच गोवा आणि मणीपूरमध्ये बहुमताचा आकडा पाठिशी नसतानाही भाजपने सत्ता स्थापन केली. काही दिवसांपूर्वीच भाजपने दिल्लीतील राजौरी गार्डनमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. आता दिल्ली महापालिका पुन्हा ताब्यात घेत भाजपने विजयी घौडदौड कायम राखत आम आदमी पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आम आदमी पक्षाला खिल्ली उडवण्यात येते आहे.