उत्तर कोरियात मानवी हक्कांचे जे उल्लंघन होत आहे त्याचा निषेध करणारा ठराव विक्रमी बहुमताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मंजूर करण्यात आला आहे. आता आमसभेच्या पूर्ण अधिवेशनात त्यावर पुढील महिन्यात मतदान होणार आहे. बाकी जगापासून स्वत:ला वेगळे ठेवणाऱ्या उत्तर कोरियात मोठय़ा प्रमाणात मानवी हक्क उल्लंघन होत आहे. त्याबाबतचा ठराव ११२ देशांच्या पाठिंब्याने मंजूर झाला आहे. गेल्यावर्षी तो १११ मतांनी मंजूर झाला होता.

युरोपी व जपानी राजनीतिज्ञांनी या ठरावाचा मसुदा तयार केला होता, त्यात २००५ पासून उत्तर कोरियात मानवी हक्कांचे वाढतच चाललेले जे उल्लंघन आहे त्याचा निषेध केला आहे. यावर्षीच्या मसुद्यात मानवी हक्कांचे पद्धतशीर, व्यापक स्वरूपात जे उल्लंघन सुरू आहे त्याचा उल्लेख केला आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी या ठरावात उत्तर कोरियाला मानवतेविरोधातील गुन्ह्य़ांसाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात हजर करण्याची सूचना सुरक्षा मंडळाला करण्यात आली आहे. पण सुरक्षा मंडळात जर उत्तर कोरियावर कारवाईचा प्रश्न आला तर त्यात चीन उत्तर कोरियाच्या बाजूने उभा राहील हे उघड आहे.
युरोपीय समुदायाचे दूत सिल्वी ल्युकास यांनी सांगितले की, उत्तर कोरियात मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे, तेथे किमान एक लाख लोकांना अत्यंत वाईट अवस्थेत तुरूंगात डांबण्यात आले आहे. ते तुरूंग बंद करून त्या लोकांना सोडून द्यावे. उत्तर कोरियाचे दूत चो म्यांग नाम यांनी हे सर्व आरोप फेटाळून अमेरिका व विरोधी देशांचा हा राजकीय संघर्षांचा कट असल्याचे म्हटले आहे. आमच्यावर कुणी दबाव आणला तर आम्ही प्रतिकार करणारच असा इशाराही त्यांनी दिला.