मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून नियुक्ती

स्वायत्ततेचा दर्जा मिळालेल्या पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयाच्या नियामक मंडळावर आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांची नियुक्ती केली आहे. डॉ. शिवाजीराव कदम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम यांचे बंधू आहेत.

अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर फग्र्युसनला स्वायतत्तेचा दर्जा प्रकाश जावडेकर यांच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नुकताच दिला आहे. त्यासाठी घातलेल्या अटींनुसार, या स्वायत्त महाविद्यालयाच्या नियामक संस्थेवर पुणे विद्यपीठ, राज्य सरकार आणि ‘यूजीसी’चा प्रतिनिधी असेल. त्यानुसार ‘यूजीसी’ने भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांची आपले प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विद्यापीठाने आपले प्रतिनिधी म्हणून डॉ. व्ही. बी. गायकवाड यांची फग्र्युसनवर नियुक्ती केली आहे. डॉ. गायकवाड हे महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे (बीसीयूडी) संचालक आहेत. पण आपला प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी राज्य सरकारला सवड मिळालेली नाही. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर हे स्वायत्त फग्र्युसनच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत. ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया, प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी आणि कर्मचाऱ्यांचेही तीन प्रतिनिधी नियामक मंडळावर आहेत.