सर्व शिक्षा अभियानांतर्गत सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांच्या ‘सबरंग ट्रस्ट’ला दिलेल्या देणग्यांचा अपहार केल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एका समितीची नियुक्ती केली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी तीन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अविजित भट्टाचारजी यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली असून, गुजरातमधील सेंट्रल विद्यापीठाचे कुलगुरू सईद बारी आणि मंत्रालयातील संचालक गया प्रसाद यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. समितीचे सदस्य म्हणून आपली नियुक्ती करण्यात आली असल्याचे अनौपचारिकपणे कळविण्यात आले असल्याचे सईद बारी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीत संग्रहालयाच्या नावावर पैशांचा अपहार करण्यात आल्याच्या प्रकरणात सेटलवाड व त्यांच्या पतीला अटक करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात पोलिसांना दिले आहेत. याच वेळी, सेटलवाड दाम्पत्याने पोलिसांना तपासाकरिता आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे पुरवावीत, असाही आदेश न्यायालयाने दिला.
सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, व्हाऊचर्स आणि ‘सबरंग ट्रस्ट’ व ‘सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस’ या त्यांच्या स्वयंसेवी संस्थांना देणग्या देणाऱ्या व्यक्तींची यादी या प्रकरणाच्या तपासाकरिता उपलब्ध करून द्यावी, असेही न्यायालयाने सांगितले.