गुरूच्या युरोपा या चंद्रावर पाण्याच्या वाफा असल्याचे दिसून आले असून नासाच्या हबल अवकाश दुर्बीणीच्या मदतीने हे संशोधन करण्यात आले आहे. या चंद्रावर सूक्ष्मजीवसृष्टी असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अॅस्ट्रॉफिजिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून युरोपाच्या संशोधनासाठी जर यान पाठवले तर तेथील काही मैलांच्या प्रदेशातील बर्फाचे उत्खनन न करताही महासागराचे निरीक्षण करता येईल. नासाचे सहायक प्रशासक जॉफ योडर यांनी सांगितले की, युरोपा चंद्रावरील सागर हा जीवसृष्टीस पोषक असू शकतो. तेथील पाण्याच्या वाफांमुळे त्याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गुरूच्या ६७ चंद्रांपैकी युरोपा हा सर्वात मोठा चंद्र असून २०१३ च्या अखेरीस तेथे पाण्याच्या वाफा हबल दुर्बीणीला दिसून आल्या होत्या. वैज्ञानिक जगतात हा उत्कंठावर्धक शोध मानला जात आहे. पाण्याच्या वाफा २०० कि.मी. उंचीवर जातात. त्यामुळे तेथे पाऊसही पडतो. स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिटय़ूटचे विल्यम स्पार्कस यांनी सांगितले की, पाण्याच्या वाफांचे प्रवाह बोटांच्या आकाराचे पण मोठे दिसतात. युरोपावर वातावरण आहे का हे शोधण्याचा या मोहिमेचा हेतू होता. युरोपा चंद्राभोवती पातळ वातावरण असून त्यात गुरूचा प्रकाश रोखण्याची क्षमता आहे. त्यामुळे सावलीसारखे दृश्य दिसते. युरोपा गुरूसमोरून तीन वेळा तरी जातो. पंधरा महिने तो गुरूसमोरून जात असताना निरीक्षण केले असता त्यात पाण्याच्या वाफा दिसल्या. जर हा निष्कर्ष खरा ठरला तर पाण्याच्या वाफा असलेला तो सौरमालेतील दुसरा चंद्र असणार आहे. दरम्यान नासा युरोपा चंद्रावर संशोधनासाठी यान पाठवणार असून त्यात पाण्याच्या वाफांच्या शक्यतेचा उलगडा होईल.