माणसाच्या शरीराची रचना ४०० वर्षे जगता येईल, अशा पद्धतीची आहे. मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे माणूस मृत्यूला निमंत्रण देतो, असे योगगुरु रामदेव बाबा यांनी म्हटले. सकस आहार आणि योग्य व्यायामाच्या मदतीने आजार आणि औषधांपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी लोकांना केले.

‘४०० वर्षे जगता येईल, अशी मानवी शरीराची रचना आहे. मात्र चुकीचा आहार आणि सदोष जीवनशैलीमुळे आपण आपल्या शरीराला त्रास देतो. आपण चुकीच्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित विकार आणि इतर आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे जीवनमान कमी होते. आपण डॉक्टर आणि औषधांवर अवलंबून राहू लागतो. मग डॉक्टर आणि औषधे आयुष्यभर आपली पाठ सोडत नाहीत,’ अशा शब्दांमध्ये रामदेव बाबांनी १२ व्या नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव्हला संबोधित केले.

यावेळी रामदेव बाबांनी उपस्थितांना विविध योग प्रकार करुन दाखवले. सध्याच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या काळात चांगले आयुष्य कसे जगता येईल, याबद्दलही रामदेव बाबांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात एखादी व्यक्ती स्वत:च्या आहाराच्या सवयींवर कशाप्रकारे नियंत्रण आणू शकते, याविषयी बोलताना त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहांचे उदाहरण दिले. शहांनी योगासनांच्या माध्यमातून ३८ किलो वजन कमी केल्याचे रामदेव बाबांनी सांगितले. ‘मी कालच अमितभाईंना भेटलो. त्यांनी जेवणात उकडलेल्या भाज्यांचा समावेश करुन, आहाराच्या सवयींवर नियंत्रण आणून तब्बल ३८ किलो वजन घटवले आहे,’ असे त्यांनी सांगितले.

कायम पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांचे मार्केटिंग करत असल्याने रामदेव बाबा यांच्यावर टीका होते. यावर बोलताना ‘मी फक्त चांगल्या वस्तूंचे मार्केटिंग करतो’, असे रामदेव बाबा म्हणाले. ‘डॉक्टर आणि औषधांपासून सुटका करुन घेण्यासाठी चांगल्या वस्तूंचा वापर करा, असे आवाहन मी करतो. चांगल्या आरोग्यासाठी सहा तास झोप, एक तास व्यायाम आणि आहाराच्या चांगल्या सवयी या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत,’ असेही ते म्हणाले.