पंजाबच्या कपूरथळातून अटक

पंजाबमधील अल्पवयीन मुलांची अवैधरीत्या युरोपमध्ये तस्करी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी विक्रमजीत सिंग याला गुन्हे शाखेच्या जबरी चोरी व दरोडा विरोधी पथकाने पंजाबमधून अटक केली. या टोळीला तस्करीसाठी मुले पुरवणे, मुलांच्या पालकांसोबत आर्थिक व्यवहार करणे ही मुख्य जबाबदारी विक्रमजीतकडे होती. धक्कादायक बाब ही की विक्रमजीत सिंग पंजाबच्या कपूरथळा भागातील अकाली दल या राजकीय पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता व जिल्हा परिषद सदस्य आहे.

जबरी चोरी व दरोडा विरोधी पथकाचे प्रभारी निरीक्षक अशोक खोत, विजय ढमाल व पथकाने एप्रिल महिन्यात टोळीचा प्रमुख आरोपी आरीफ फारूकी व त्याच्या तीन साथीदारांना गजाआड केले होते. त्या कारवाईत पंजाबमधील चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची नावे बदलून नवे पासपोर्ट काढण्यात आले होते. चौकशीत ही मुले विक्रमजीतने पाठवल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापासून विक्रमजीत फरार होता. गेल्या आठवडय़ात विक्रमजीत घरी परतल्याची माहिती खबऱ्यांकडून खोत, ढमाल यांना मिळाली. त्यानुसार लगोलग एक पथक कपूरथलाला रवाना झाले. विक्रमजीत घरीच सापडला. त्याला अटक करून मुंबईत आणण्यात आले. ही पथकाने केलेली १४वी अटक आहे.

राजकीय वलय असल्याने विक्रमजीतची परिसरात चांगलीच ओळख होती. त्याचा वापर करत विक्रमजीतने मुंबईतील फारूखी व अन्य आरोपींच्या मदतीने पंजाबमधील अल्पवयीन मुलांची अवैधरीत्या पॅरिस व युरोपात अन्यत्र तस्करी करण्यास सुरुवात केली.  पालकांकडून १० ते १५ लाख रुपये घेऊन विक्रमजीत त्यांच्या अल्पवयीन मुलांना मुंबईला फारूखीकडे पाठवे. फारूखी व त्याचे साथीदार या मुलांची नावे बदलून पासपोर्ट काढत. बॉलीवूडमध्ये छायाचित्रकार म्हणून काही वष्रे काम केल्याने फारूखीचा संपर्क दांडगा होता. सध्या काम नसलेले पण याआधी कामानिमित्त युरोप व अन्य देशांमध्ये जाऊन आलेले लाइटमन, साहाय्यक कॅमेरामन, केशभूषाकार आदींना आपल्या टोळीत वाहक (कॅरिअर) म्हणून सहभागी केले. ज्या वाहकाला व्हिसा मिळेल त्याच्यासोबत त्याचीच मुले म्हणून पंजाबमधून विक्रमजीतने धाडलेल्या मुलांना पाठवले जाई. त्याने आतापर्यंत किती मुलांना युरोपात धाडले याबाबत कसून चौकशी सुरू आहे.