ऑस्ट्रेलिया खंडात ६५ हजार वर्षांपूर्वी मानवाचे अस्तित्व असल्याचे पुरावे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मिळाले आहे. या शोधाने आधुनिक मानवाने आफ्रिकेतून स्थलांतराला सुरुवात केल्याच्या ज्ञात इतिहासाला बदलले आहे. ऑस्ट्रेलिया खंडाच्या उत्तरेकडील प्राचीन काकाडूतील जाबिलूका येथील खाणींच्या पट्टय़ामध्ये पुरातत्त्व खोदकामात ऑस्ट्रेलियातील आदिवासी जमातीचे वास्तव्य येथे किमान ६५ हजार वर्षांपासून असल्याचे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना आढळून आले. त्याप्रमाणे येथे राहणारे मानवाचे पूर्वज हे अवजारे बनविण्यातदेखील कुशल असल्याचे आढळले. याआधी समजल्या जाणाऱ्या काळाच्या १८ हजार वर्षांपूर्वीपासून मानवाचे ऑस्टेलियात वास्तव्य होते असे आढळून आले. या नव्या शोधामुळे जगभरातील पुरातत्त्वक्षेत्रामध्ये कुतूहल निर्माण झाले असून या संशोधनाची समीक्षा प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी केली असून ती नेचर या प्रतिष्ठित विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आस्ट्रेलियात वास्तव्य करणारा मानव हा त्या काळातील अत्याधुनिक अवजारे बनवत असल्याचे संशोधनादरम्यान आढळलेल्या अवजारांवरून सिद्ध होते. अशा प्रकारच्या अवजारांची निर्मिती त्यानंतर २० हजार वर्षांनी झाल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

संशोधनात आम्हाला संपूर्ण: जतन केलेल्या कुऱ्हाडी आढळल्या असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या आतंरराष्ट्रीय संघाचे प्रमुख आणि क्विन्सलॅँड विद्यापीठाचे सहकारी प्राध्यापक क्रिस क्लार्कसन यांनी फेअरफॅक्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

इतिहास बदलला?

या नव्या शोधामुळे आधुनिक मानव हा आफ्रिका खंडातून स्थलांतरित झाला होता या संकल्पनेला तडा गेला आहे.