सर्व दहशतवाद्यांना संपवूनही काश्मीरमधील समस्या संपणार नाही, असे विधान हुर्रियत नेता मिरवेज उमर फारुखने केले आहे. काश्मीरमधील एक दहशतवादी मारल्यास, दहा दहशतवादी तयार होतील, असा इशाराही फारुखने सरकारला दिला. ‘जोपर्यंत काश्मीरमध्ये दडपशाही सुरु राहिल, तोपर्यंत काश्मीरमधील अशांतता आणि दहशतवादी कारवाया सुरुच राहतील,’ असेही त्याने म्हटले.

‘काश्मीरमध्ये दररोज सुशिक्षित तरुण मारले जात आहेत. काश्मीरमधील सर्व दहशतवादी मारले गेल्यावर समस्या संपेल, असे काहींना वाटते. मात्र असा विचार करणाऱ्यांनी काश्मीरमधील तरुणांनी दडपशाहीच्या विरोधात हाती बंदुका घेतल्या आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. दडपशाहीला प्रत्युत्तर म्हणून काश्मीरमधील तरुणांनी हातात शस्त्रे घेतली आहेत. त्यामुळे जोपर्यंत दडपशाही संपत नाही, तोपर्यंत काश्मीरमधील समस्या संपणार नाही. सुरक्षा दलाकडून एक दहशतवादी मारला गेल्यास, दहा दहशतवादी निर्माण होतील,’ असे हुर्रियत नेता मिरवेज फारुखने म्हटले.

काश्मीरमध्ये सध्या दहशतवाद्यांविरोधात सैन्याकडून कारवाई केली जात आहे. सैन्याकडून सुरु असलेल्या ‘ऑल आऊट’ ऑपरेशनच्या अंतर्गत आतापर्यंत हिज्बुल मुजाहिद्दीनसह अनेक दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. याशिवाय फुटिरतावादी नेत्यांविरोधातही राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून काश्मीर प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल, अशी विधाने केली जात आहेत. मात्र हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणीला ठार केल्यानंतरच्या वर्षभरानंतरही काश्मीरमधील अशांतता कायम आहे.

‘दहशतवाद्यांना संपवण्यात आले तरी, काश्मीरमधील लोकांच्या मनातील भावना संपू शकणार नाहीत. दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेतून काश्मिरींच्या भावना दिसून येतात. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये वारंवार होणारी आंदोलने यांच्यामधून काश्मीर खोऱ्यातील तरुणांच्या मनात नेमके काय आहे, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. काश्मीरमधील विद्यार्थ्यांच्या भावना या सरकारी धोरणांचे पडसाद आहेत,’ असे हुर्रियत नेता मिरवेजने म्हटले.