पाकिस्तानातून काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना मिळणाऱ्या आर्थिक रसदीची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. चौकशीदरम्यान, यंत्रणेला फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, गिलानी यांना पाकिस्तानकडून पैसे मिळत होते, अशी कबुली फुटीरतावादी नेते फारुख अहमद डार, जावेद अहमद बाबा आणि नईम खान यांनी चौकशीवेळी दिली आहे. पाकमधून विविध माध्यमांतून त्यांना पैसे मिळत होते, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. या कबुलीमुळे काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना खरा चेहरा समोर आला आहे.

मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद आणि पाकिस्तानातील विविध दहशतवादी गटांकडून जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते एस.ए.एस गिलानी, नईम खान, फारुख अहमद डार या नेत्यांना मिळणाऱ्या आर्थिक रसदीची राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात येत आहे. एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नुकतेच यासंदर्भात श्रीनगरला गेले होते. त्यावेळी त्यांनी प्राथमिक चौकशी केली होती. सध्या या नेत्यांची दिल्लीतील एनआयएच्या मुख्यालयात चौकशी सुरू आहे. चौकशीत त्यांनी पाकिस्तानातील विविध गटांकडून गिलानी यांना पैसे मिळत असल्याची कबुली दिल्याचे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे. या खेळात आम्ही तर फक्त प्यादे आहोत. प्रत्यक्षात वजीर कोणी दुसराच आहे, असेही त्यांनी सांगितल्याचे समजते. या नेत्यांच्या कबुलीनंतर आता एनआयए सय्यद अली शाह गिलानी यांच्याभोवतीचा कारवाईचा फास आणखी आवळणार असल्याचे मानले जाते. यंत्रणेने या प्रकरणाशी संबंधित १५० एफआयआर आणि १३ आरोपपत्रांचाही या चौकशीत समावेश करण्यात आला आहे. या सर्वाचा यंत्रणेकडून सखोल अभ्यास करण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले.