भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध सुधारण्यात नरेंद्र मोदींबरोबर सुषमा स्वराज यांचा अभ्यासपूर्वक ‘टच’देखील तितकाच महत्त्वाचा आहे. दिल्लीत नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे सुषमा स्वराज यांच्या तत्परतेचा आणि संवेदनशीलतेचा प्रत्यय आला. प्रेमी जोडप्यांची ताटातूट होते, त्यांना विरह सहन करावा लागतो आणि सरतेशेवेटी त्यांचे मिलन घडून येते, अशा धाटणीचे अनेक हिंदी चित्रपट आपण आजवर पाहिले असतील. असाच काहीसा प्रकार काल दिल्लीत घडला. फैझन पटेल हा काल त्याची पत्नी सना हिच्यासोबत मधुचंद्रासाठी युरोपला जाण्यासाठी निघाला होता. मात्र, विमानतळावर आल्यानंतर सनाचा पासपोर्ट हरवल्याचे लक्षात आले. साहजिकच दोघांना यामुळे मोठा धक्का बसला. मात्र, यावेळी फैझलने एक अचंबित करणार निर्णय घेतला. सनाला मागे ठेवून फैझल एकटाच युरोपवारीला निघाला. विमानात बसल्यानंतर फैझलने आपल्या पत्नीचा फोटो बाजूच्या सीटवर लावला. त्यानंतर फैझलने त्याचे विमानातील छायाचित्र सुषमा स्वराज यांना ट्विट केले आणि मदत करण्याची विनंती केली. विशेष म्हणजे सुषमा स्वराज यांनीही फैझलच्या ट्विटची दखल घेतली. तुझ्या पत्नीला मला संपर्क करायला सांग. ती लवकरच तुझ्याशेजारी बसली असेल, असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने माझ्या कार्यालयाने तिच्याशी संपर्क साधला असून तिला डुप्लिकेट पासपोर्ट दिला जाईल, असेही स्वराज यांनी फैझलला सांगितले.