कन्सास शहरात अभियंत्यावर बेछूट गोळीबार; सहकारी जबर जखमी

अमेरिकेतील कन्सास शहरात बुधवारी रात्री एका भारतीय तरुणाची वर्णविद्वेषातून निर्घृण हत्या झाली. श्रीनिवास कुचीभोतला (३२) असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा हैदराबाद येथील रहिवासी आहे. या घटनेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली असून नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य बनली आहेत.

गार्मिन या कंपनीच्या मुख्यालयात जीपीएस निर्माता म्हणून काम करणारा अभियंता श्रीनिवास त्याचा सहकारी आलोक मदासानी याच्याबरोबर ओलेद येथील ऑस्टिन्स बार अ‍ॅण्ड ग्रील या बारमध्ये फुटबॉलचा सामना पाहात होते. त्याच बारमध्ये अ‍ॅडम पुरिन्टन (५१) हा अमेरिकी नौदलातून निवृत्त झालेला सैनिकही बसला होता. अ‍ॅडमने श्रीनिवास आणि आलोक यांच्याशी वाद उकरून काढला. वादादरम्यान त्याने श्रीनिवास आणि आलोक यांना उद्देशून ‘तुम्ही दहशतवादी आहात. माझ्या देशातून चालते व्हा’, असे ओरडून सांगितले. तसेच ‘तुम्ही आमच्या देशात काय करत आहात’, अशी विचारणा करत दोघांवर चाल केली. मात्र बारमधील इतरांनी अ‍ॅडमला अडवले. त्यानंतर अ‍ॅडम तेथून बाहेर पडला व थोडय़ा वेळाने बंदूक घेऊन पुन्हा बारमध्ये आला. त्याने श्रीनिवास आणि आलोकवर अचानक गोळीबार सुरू केला. त्यात श्रीनिवास आणि आलोक जखमी झाले. उभयताना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र श्रीनिवासचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आलोकची प्रकृती स्थिर आहे. या घटनेने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. वर्णविद्वेषातून हा हल्ला झाला किंवा कसे, याबाबत पोलीस यंत्रणा तपास करत आहेत. एफबीआयनेही तपासात सहभाग घेतला असून वर्णविद्वेषातून ही घटना घडली असावी, असे म्हणणे घाईचे ठरेल, असे एफबीआयच्या स्थानिक अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुरिन्टन याला गुरुवारी सकाळी पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

इयान ग्रिलोट, द हिरो

श्रीनिवास आणि आलोकवर गोळीबार सुरू असताना अ‍ॅडमला अडवण्याची हिंमत दाखवणारा इयान ग्रिलोट हा २४ वर्षीय तरुण सध्या समाजमाध्यमावर चर्चेचा विषय बनला आहे. गोळीबारादरम्यान एका टेबलाखाली लपलेल्या इयानने अ‍ॅडमने गोळ्यांचा वर्षांव केल्यानंतर त्याला पाठीमागून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत अ‍ॅडमने त्याच्यावरही गोळी झाडली. इयानवर सध्या उपचार सुरू आहेत. अ‍ॅडमने गोळ्या झाडल्या त्या वेळी आपण त्या मोजल्या. सहा गोळ्या त्याने झाडल्याने आता त्याच्या रिव्हॉल्व्हरमधील गोळ्या संपल्या असतील असा आपला हिशेब होता. मात्र तो चुकल्याने गोळी लागल्याचे इयान म्हणतो. मात्र केलेल्या कृत्याचा त्याला अभिमान आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या इयानच्या कृतीवर जगभरातून त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली जात आहेत.