इसिस या दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या हैदराबाद येथील भारतीय तरुणाचा सीरियात एका युद्धादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. मोहद हनीफ वसीम हा २७ वर्षीय अभियांत्रिकीची पदवी ग्रहण केलेला युवक फेब्रुवारी महिन्यात इसिस या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर तेलंगणा पोलीसांनी हनीफच्या इसिसमध्ये सामील होण्यासंबंधीची आणखी माहिती मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते. तसेच हनीफ सीरियात कसा दाखल झाला याचाही शोध घेतला जात आहे. हनीफने हैदराबादमधून अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण चार वर्षांपूर्वीच पूर्ण केले होते. यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी तो लंडनमध्ये गेला होता. तेथूनच तो फेब्रुवारी महिन्यात सीरियासाठी रवाना झाल्याचे समजते. सीरियात दाखल झाल्यानंतर इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात तो आला आणि एका युद्धा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती हनीफच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.
गुप्तचर विभागाच्या अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, हनीफचा सीरियामध्ये झालेला मृत्यू युद्धादरम्यान झाला की अपघाताने झाला याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण, मार्च महिन्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आणि हीच माहिती त्याचा कुटुंबियांनाही देण्यात आली आहे. मूळचे तेलंगणातील हे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून हैदराबादमध्ये वास्तव्याला येऊन कायमस्वरुपी स्थिर झाले. हनीफचा मृत्यू झाल्याचा अरबी भाषेतील एसएमएस कुटुंबियांच्या मोबाईलवर आला होता. सोशल मीडियातून आकर्षित होऊन हनीफ इसिसमध्ये दाखल झाल्याची शक्यता असल्याचेही अधिकऱयांचे म्हणणे आहे.