हैदराबादमधील चांदनी जैन या मुलीच्या हत्येप्रकरणी बुधवारी पोलिसांनी तिच्या मित्राला अटक केली. मित्राला भेटण्यासाठी शनिवारी संध्याकाळी घरातून बाहेर पडलेली चांदनी घरी परतलीच नव्हती. त्यानंतर काल अमीनपूर परिसरात निर्जनस्थळी तिचा मृतदेह सापडला. सुरुवातीला ब्ल्यू व्हेल या गेममुळे चांदनीने आत्महत्या केल्याची चर्चा होती. मात्र, पोलिसांनी तेव्हाच ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली होती. परंतु, ती खूप लहरी स्वभावाची आहे. तासनतास मोबाईल फोनवर चॅटिंग करत असते, अशी माहिती पालकांनी दिल्यामुळे याबाबतचा संभ्रम कायम होता. अखेर पोलिसांनी आज या प्रकरणाचा छडा लावत तिच्या मित्राला ताब्यात घेतले. तो चांदनीचा बालपणीपासूनचा मित्र होता.

या १७ वर्षीय आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, २०१५ पासून चांदनी आणि त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते. त्यामुळे मला हे नाते संपवायचे होते. परंतु, ती वारंवार मला मेसेज आणि फोन करत होती. अखेर या सर्वाचा सोक्षमोक्ष लावायचा हे ठरवून मी तिला शनिवारी संध्याकाळी भेटायला बोलावले. त्यावेळी आम्ही टेकडीवर फिरायला गेलो. त्या ठिकाणी आमच्यात खूप वाद झाला आणि रागाच्या भरात मी तिला मारले. त्यानंतर तिला टेकडीवरून ढकलून दिले, अशी कबुली आरोपीने दिली.

या घटनेनंतर दोन तासांनी आरोपीला चांदनीच्या बहिणीचा फोनही आला होता. मात्र, तेव्हा चांदनी माझ्यासोबत नसल्याचे त्याने सांगितले. इतकेच नव्हे तर त्याने चांदनीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांसमोर आणि शेजाऱ्यांसमोर तिला शोधण्याचे नाटकही केले. परंतु सीसीटीव्ही फुटेजमुळे त्याचा बनाव उघड झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो आणि चांदनी रिक्षातून एकत्र जाताना, तसेच टेकडीच्या दिशेने जाताना दिसून आले. या फुटेजच्याआधारे पोलिसांनी आणखी तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती.