लग्नासाठी अरबी नागरिकांना भारतातील अल्पवयीन मुलींची खरेदी-विक्री करणाऱे एक मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट बुधवारी हैदराबाद पोलिसांनी उध्वस्त केले. या मोठ्या कारवाईत पोलिसांनी आठ लोकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये ओमान, कतार येथील नागरिक तसेच तीन भारतीय काझींचा समावेश आहे.


ताब्यात घेण्यात आलेल्या काझींमध्ये मुंबई येथील फरिद अहमद खान या मुख्य काझीचा समावेश आहे. त्याचबरोबर चार लॉजचे मालक आणि पाच दलालांनाही पोलिसांनी अटक केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या अरबी शेखनी दलाल, काझी आणि लॉज मालकांच्या मदतीने येथील अल्पवयीन मुलींशी लग्न केल्याची माहिती हैदराबाद शहर पोलीस आयुक्त एम. महेंदर रेड्डी यांनी दिली.

या कारवाईनंतर अत्यंत धक्कादायक बाब समोर आली असून लग्नाचे हे रॅकेट हैदराबादपासून ओमान आणि इतर अरब देशांपर्यंत पसरले आहे. या प्रकरणी गेल्या महिन्यात जुन्या हैदराबाद शहरातील फलकनुमा येथे एका महिलेने तक्रार दाखल केली होती. या महिलेने तक्रारीत म्हटले होते की, तिच्या पतीने काही दलालांच्या मदतीने तिच्या अल्पवयीन मुलीला एका ७० वर्षीय ओमानी नागरिक अहमद अब्दुल्ला याला विकले आहे. माझी मुलगी सध्या ओमान येथे अडकून पडली आहे.

तक्रारीची गंभीर दखल घेत या अल्पवयीन मुलीची ओमान येथून सुटका करण्यासाठी तसेच आरोपींना हैदराबादमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते, असे पोलीस आयुक्त रेड्डी यांनी सांगितले.