आर्य वैश्य समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

आर्य वैश्य समाजावर लिहिलेल्या पुस्तकातून या समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली प्रख्यात दलित लेखकांचा इलैया यांच्याविरुद्ध हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

‘सामाजिका स्मगलुरुलू कोमाटोल्लु’ (वैश्य हे सामाजिक तस्कर आहेत) या आपल्या पुस्तकातून इलैया यांनी केवळ वैश्य समाजालाच नव्हे, तर सर्व हिंदू समुदायांना लक्ष्य केले असून दलित व इतरांच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप अनुसूचित जातीच्या एका विद्यार्थ्यांने यापूर्वी केला होता, असे मल्काजगिरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जानकी रेड्डी यांनी सांगितले. २२ वर्षे वयाच्या या तक्रारकर्त्यांने न्यायालयात धाव घेतली होती आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी बुधवारी इलैयाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

धर्म, वंश यांच्या आधारे निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व पसरवणे आणि धर्म किंवा धार्मिक समजुती यांचा अपमान करून एखाद्या समुदायाच्या धार्मिक भावना दुखावणे यासाठी भारतीय दंड विधानाच्या कलमांनुसार, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यापासून तेलंगणातील आर्य वैश्य समाज इलैया यांच्याविरुद्ध राज्यभर निदर्शने करून त्यांचा निषेध करत आहे.

वारंगलमधील पारकल येथे चार जणांनी आपल्या वाहनावर हल्ला करून आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार या लेखकाने गेल्या महिन्यात पोलिसांकडे केली होती. या कथित हल्ल्यानंतर समोरासमोर आलेल्या आर्य वैश्य आणि दलित समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता. तथापि, पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवून परिस्थिती चिघळू दिली नव्हती.या पुस्तकामुळे आर्य वैश्य समाज इलैयांवर चिडलेला असून, लेखकाने माफी मागावी अशी त्यांची मागणी आहे.