जयललिता यांच्या निधनानंतर संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाले आहे. त्यामुळे चेन्नईमधील अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही फारशी आहे. शोकमग्न असलेल्या चेन्नईतील लोकांच्या मदतीला हैदराबादमधील तंत्रज्ञ धावून आले आहेत. चेन्नईला आवश्यक असणारे ४०% तंत्रज्ञान सहाय्य हैदराबादमधून दिले जाते आहे. तामिळनाडूतील लोकांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर येण्यात हैदराबादमधील तंत्रज्ञ महत्त्वपूर्ण भूमिका महत्त्वाची बजावत आहेत.

चेन्नईतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. मात्र अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी ऐच्छिक सुट्टी दिली. त्यामुळे चेन्नईमधील अनेक कंपन्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. या परिस्थितीत हैदराबादमधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञांनी चेन्नईतील कार्यालयांना तांत्रिक सहाय्य पुरवले आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडू सरकारकडून सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे चेन्नईमधील अनेक कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये पुरेसे कर्मचारी नाहीत. शोकसागरात बुडालेल्या चेन्नईतील तंत्रज्ञांच्या हैदराबादमधील तंत्रज्ञ धावून आले आहेत. आणखी चार ते सात दिवस चेन्नईतील कंपन्यांना हैदराबादमधून तांत्रिक सहाय्य देण्यात येणार आहे. चेन्नईकरांच्या मनस्थितीसोबत चेन्नईतील राजकीय परिस्थितीदेखील पूर्वपदावर आलेली नाही.

‘माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कोणतीही आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास हैदराबादला फायदा होतो,’ असे आयडियाबाईट्स सॉफ्टवेअर प्रायव्हेड लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास रेड्डी कट्टा यांनी म्हटले आहे. ‘तामिळनाडूतील लोकांचे जयललितांसोबत भावनिक संबंध आहेत. जयललिता यांच्या निधनामुळे सर्वच दु:खी आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस कोणीही त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकणार नाही,’ असे विविधा माहिती तंत्रज्ञान इंडिया प्रायव्हेड लिमिटेडचे कार्यकारी संचालक व्यंकटा वनम यांनी म्हटले आहे. ‘सध्याच्या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी किमान तीन ते सहा महिने लागतील,’ असेही व्यंकटा वनम यांनी म्हटले आहे.

‘चेन्नईतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी स्थैर्य आवश्यक आहे. जोपर्यंत चेन्नईतील प्रशाकीय स्थिती स्थिरस्थावर होत नाही, तोपर्यंत नव्या कंपन्या चेन्नईत येऊ शकणार नाहीत. याशिवाय सध्या चेन्नईत असणाऱ्या कंपन्यांकडून विस्ताराचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे या सर्व काळात तामिळनाडूतील कंपन्यांना हैदराबाद हाच सर्वोत्तम पर्याय असेल,’ असे तेलंगणा इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप कुमार मक्थाला यांनी म्हटले आहे.