माझे आयुष्यही चारचौघांप्रमाणे सामान्य असून मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. मात्र, अनेकदा समारंभांमध्ये लोक मला शांत बसल्याचे पाहून किंवा ओरडत नसल्याचे पाहून अवाक होतात, असे प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी सांगितले. ‘रेड एफएम’ रेडिओ चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अर्णब यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी अर्णब यांनी अनेक विषयांवर मोकळेपणाने भाष्य केले. प्रसारमाध्यमांच्या दुनियेत अर्णब गोस्वामी आक्रमक सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, या मुलाखतीत अर्णब यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा पैलू अनुभवायला मिळाला.
मी एक चांगला श्रोता आहे. मात्र, अनेकांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र, माझ्या मित्रांच्या मते मी एक चांगला श्रोता आहे. अनेकांना हे पटणार नाही. मी जेव्हा माझ्या मित्रांबरोबर असतो, तेव्हा मी फार कमी बोलतो आणि त्यांच्या गप्पा ऐकण्याला प्राधान्य देतो, असे अर्णब यांनी सांगितले.
अर्णब गोस्वामी खरंच पत्रकार आहे का?; बरखा दत्त यांची आगपाखड
मला शालेय जीवनापासूनच वादविवादाची आवड होती. सुरूवातीला मी या क्षेत्रात आलो तेव्हा अतिशय शांतपणे बोलत असे. मात्र, माझ्यात वादविवाद करण्याची आवड कायम होती. त्यामुळे मला स्वत:चे नवीन न्यूज चॅनेल सुरू करण्याची संधी मिळाली तेव्हा मला माझ्या आवडीच्या विषयाकडे वळता आले. गेल्या सात-आठ वर्षांपासून माझी वादविवादाची आवड माझे करियर बनले आहे. मी या सगळ्याचा खूप आनंद घेत असल्याचे अर्णब गोस्वामी यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी ‘एनडीटीव्ही’च्या पत्रकार बरखा दत्त यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ‘टाइम्स नाऊ’चे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना लक्ष्य केले. ‘टाइम्स नाऊ’कडून प्रसारमाध्यमांचा आवाज बंद करण्याची, पत्रकारांवर खटले चालविण्याची आणि त्यांना शिक्षा करण्याचा मुद्दा चर्चेला आणण्यात आला. ही मागणी करणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना पत्रकार म्हणायचे का? त्यांच्या या मागणीमुळे मला मी पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्याची लाज वाटते, असे बरखा यांनी म्हटले होते. काही दिवसांपूर्वी ‘आज तक’ वृत्तवाहिनीकडून अर्णब गोस्वामी यांच्यावर अशाच प्रकारची टीका करण्यात आली होती. अर्णब गोस्वामी यांनी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. मात्र, ही एका चमच्याने घेतलेली मुलाखत आहे, असे ट्विट करून ‘आज तक’ने एकच खळबळ उडवून दिली होती. पण नंतर या प्रकरणात दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती.
अर्णब गोस्वामींवर डॉ. झाकीर नाईक यांनी ठोकला अब्रुनुकसानीचा दावा