राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा देशात फूट पाडणारी असल्यामुळेच मी कायम या विचारधारेचा विरोधच करत राहीन, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एका खटल्याच्या सुनावणीसाठी ते गुरुवारी गुवाहाटीमध्ये आले होते. या खटल्यामध्ये न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
देशातील गरिब शेतकरी आणि बेरोजगारांच्या हक्कांसाठी लढा उभारत असल्यामुळेच माझ्याविरोधात वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये खटले दाखल करण्यात येत असल्याचा आरोप करून राहुल गांधी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा समाजात फूट पाडणारी आहे. त्यामुळेच मी त्याचा खंबीरपणे विरोध करतो. माझ्याविरोधात ते कितीही खटले दाखल करू देत. मी अजिबात मागे हटणार नाही. मी खंबीरपणे देशाच्या एकात्मतेसाठी लढा देत राहिन. त्यांच्याविरोधात लढण्यातच मला आनंद आहे.
संघाच्या सांगण्यावरूनच आपल्याला आसाममधील एका मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गुन्हेगारी स्वरुपाचा खटला गेल्यावर्षी गुवाहाटीतील न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. त्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी गुरुवारी गुवाहाटीतील न्यायालयात आले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याआधी भिवंडीतील न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केलेला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एका प्रचारसभेत केला होता. त्यावरून त्यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे.