आपल्याला भारताबद्दल कधीही दुरावा वाटला नाही, असे सांगत म्यानमारच्या विरोधी पक्षनेत्या आणि लोकशाहीवादी नेत्या आँग सान सूची यांनी, स्वत:ला अंशत: भारताची नागरिक संबोधल़े  सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेल्या सूची शुक्रवारी नवी दिल्लीतील लेडी श्रीराम महाविद्यालयात आयोजित स्नेहसंमेलनात बोलत होत्या़  याच महाविद्यालयातूनच त्यांनी १९६४ साली आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आह़े
आपल्या आयुष्यातील जडणघडणीच्या दिवसांत श्रीराम महाविद्यालयासारख्या नामांकित संस्थेत शिक्षणाची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केल़े  तसेच सद्यस्थितीत भारताशी तसा संपर्क राहिला नसला तरीही आपल्याला भारतापासून दूर गेल्यासारखे मुळीच भासत नसल्याचे सांगताना त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना ‘माझ्या मुली’ असे संबोधल़े  आपण प्रेम आाणि आदराने अंशत: भारताच्याच नागरिक असल्याचेही त्या म्हणाल्या़  सूची सुमारे २५ वर्षांनंतर भारतात आल्या आहेत़  भारतीय नागरिक आपल्याशी ९बौद्धिक नव्हे तर भावनिक बंधांनी बांधले गेले असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या़
श्रीराम महाविद्यालयात परत येणे म्हणजे केवळ आपल्या घरी परत येणे नसून, ज्या ठिकाणी आपल्या लोकशाहीबद्दलच्या आकांक्षा चुकीच्या नसल्याची जाणीव झाली त्या ठिकाणी परत येणे असल्याचे भावनिक उद्गारही सूची यांनी या वेळी काढल़े