गेल्या काही दिवसांमध्ये भाजप नेत्यांकडून सुरू असलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्वाणीचे हत्यार उपसले आहे. पक्षातील नेत्यांनी वादग्रस्त विधाने करण्याचे थांबवाबे, अन्यथा मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देईन, असे मोदींकडून सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाचाळ नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे पक्षाला मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. हिंदुत्त्वाचे कडवे समर्थक असणाऱ्या या नेत्यांच्या वक्तव्यांवर नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करत विरोधकांनी राज्यसभेचे कामकाज ठप्प पाडले होते. आता मात्र, मोदींच्या या विधानाची गंभीरपणे दखल घेत पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काही कडक पाऊले उचलण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
आधी साध्वी निरंजन ज्योतीचे वादग्रस्त विधान, त्यानंतर आग्र्यातील धर्मांतराचा मुद्दा, पनवेलमध्ये नथुराम गोडसेंच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम.. अशा एकापाठोपाठ एक घटनांमुळे भाजप सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे हैराण झालेल्या मोदींनी आता अंतिम उपाय म्हणून हा मार्ग स्विकारल्याचे बोलले जात आहे. केंद्रात भाजपचे सरकार आणण्यात मोदींचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे मोदींचा हा इशारा महागात पडू शकतो, हे सगळेच जाणतात. मात्र, आता ही मात्रा वाचाळ नेत्यांना कितपत लागू पडते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.