मी मोदींच्या भ्रष्टाचारमुक्त मोहिमेने खूपच प्रभावित झाल्याचे कौतुकोद्गार भारताचे माजी परराष्ट्र मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांनी काढले आहेत. एस.एम. कृष्णा यांनी कालच अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज लगेचच कृष्णा यांनी मोदीनामाचे गोडवे गायला सुरूवात केली आहे. मोदी किंचितही भ्रष्टाचार खपवून घेणारे नाहीत. त्यांच्या या गुणाने मी प्रभावित झालो आहे. तसेच मोदींनी घेतलेल्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाला माझा पूर्णपणे पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी एस.एम. कृष्णा यांनी काँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीवरही भाष्य केले. काँग्रेसची वरपासून खालपर्यंत पुनर्बांधणी झाली पाहिजे. मात्र, पक्ष नेतृत्त्व याबाबत गंभीर दिसत नाही. पक्षाचे नेतृत्त्व आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संवाद उरलेला नाही. काँग्रेसमध्ये असताना मला आदर मिळावा आणि वेळोवेळी माझा सल्ला घेतला जावा एवढीच माझी माफक अपेक्षा होती. मला कोणतेही पद मागितले नव्हते, असे एस.एम.कृष्णा यांनी स्पष्ट केले. कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एस.एम.कृष्णा यांचा भाजपमधील प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे. केंद्रात सत्तेत आल्यापासून भाजपने विरोधी पक्षातील ताकदवान नेत्यांना गळाला लावण्याची रणनीती अबलंबिली आहे.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री आणि गांधी घराण्याचे निष्ठावंत अशी एस. एम. कृष्णा यांची ओळख होती. मात्र, काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान होत नसल्याचे सांगत त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाने मला सर्वकाही दिल्याचेही म्हटले होते. मी चांगला आणि वाईट असा दोन्हीप्रकारचा काळ बघितला आहे, कडूगोड अनुभव घेतले आहेत. माझी काँग्रेसवरील निष्ठा अढळ होती. मात्र, काँग्रेसला आता लोकनेत्यांची गरज उरली नसून त्यांना फक्त मॅनेजर्स हवे आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या नेत्यांचे पक्षातील महत्त्व कमी झाले आहे. काँग्रेसमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांची अवहेलना केली जात आहे. माझं वय जास्त असल्याने मला डावलले जात असल्याचेही कृष्णा यांनी सांगितले होते. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी एस.एम. कृष्णा यांना पक्षात परत आणण्यासाठी प्रयत्नही केले होते. मात्र, माझ्यासाठी तो विषय कायमचा संपल्याचे सांगत कृष्णा यांनी या प्रयत्नांना मूठमाती दिली होती.काँग्रेस पक्षातील दीर्घ कारकीर्दीत एस एम कृष्णा यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोघांबरोबरही काम केले होते. १९६८ साली ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर १९९९ मध्ये ते कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले, २००४ पर्यंत ते या पदावर होते. याशिवाय, मनमोहन सिंग सरकारच्या काळात त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम पाहिले होते.