आपण आता नव्या पक्षाची स्थापना करणार नाही, असे समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी म्हटले आहे. सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आता नव्या पक्षाची स्थापना करणार नाही : मुलायमसिंह यादव


मुलायमसिंह यादव नवा पक्ष स्थापन करणार असल्याची अफवा पसरल्याने याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावर या केवळ अफवाच असल्याचे सांगत आपण आता कुठलाही नवा पक्ष स्थापन करणार नाही, मात्र काही नव्या घोषणा येत्या काळात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष असलेले मुलायमसिंह यांनी पुत्र अखिलेश यादव यांच्याबाबतही यावेळी चर्चा केली. ते म्हणाले, “अखिलेश माझा मुलगा आहे. त्यामुळे माझ्या शुभेच्छा कायमच त्यांच्या पाठीशी राहतील. मात्र, त्यांच्या निर्णयाशी मी सहमत नाही.” त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत येत्या काळात त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुलायम यांनी यावेळी सांगितले.


मुलायम म्हणाले, “केंद्र सरकारने दिलेल्या कुठल्याही आश्वासनांची तीन वर्षांत पूर्तता झालेली नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. बनारस हिंदू विद्यापीठातील मुली सुरक्षित नाहीत. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती वाईट बनली आहे. शेतकऱ्यांची अवस्थाही कठीण बनली आहे. योगी सरकारमध्ये शेतकऱ्यांची फरफट होते आहे.”

दरम्यान, पुन्हा एकदा मुलायमसिंह यादव यांनी विरोधकांना भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले.