‘भारताच्या लोकांनी मला खूप प्रेम दिले, या देशापासून दूर आहोत असे मला कधीच वाटले नाही’ अशा शब्दांत म्यानमारच्या नोबेल विजेत्या लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. येथील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी कॉलेज जीवनातील आठवणी, म्यानमारमधील लोकशाहीचा लढा यावर दिलखुलासपणे बोलताना मूल्याधिष्ठित राजकारणाला पर्याय नाही असा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला.
दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून आँग सान स्यू की या १९६४ मध्ये पदवीधर झाल्या. विद्यार्थिदशेतील ते दिवस आठवताना त्या काहीशा भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, की ‘मी स्वत:ला काहीअंशी प्रेम व सन्मानाचे प्रतीक असलेल्या भारताची नागरिक समजते.’
विद्यार्थिदशेतील आठवणीत रमलेल्या स्यू की म्हणाल्या, की या देशाशी फार कमी संपर्क असतानाच्या काळातही भारतापासून दूर आहोत असे मला कधीच वाटले नाही. यापूर्वी त्या १९८७ मध्ये भारतात आल्या होत्या.
‘भारतीय लोकांचे आपल्याशी असलेले बंध हे बौद्धिक पातळीपेक्षाही भावनिक पातळीवरचे आहेत. लेडी श्रीराम कॉलेजमध्ये आता मी आले आहे, हे केवळ स्वगृही येण्यासारखे नाही तर जिथे मला माझ्या आशाआकांक्षा चुकीच्या नाहीत हे समजले ते हे ठिकाण आहे’ असे त्यांनी या वेळी सांगितले.
‘गांधीजींचे ‘रघुपती राघव राजाराम’ हे गीत गाण्यासाठी मी पुन्हा एकदा या सभागृहात कधीतरी परत येईन असे आतून वाटत होते,’ असे त्यांनी सस्मित मुद्रेने सांगताच टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला.
स्यू की यांच्या गतकाळातील आठवणी व त्यांच्या म्यानमारमधील लोकशाहीच्या लढय़ाची कहाणी अनुभवण्यासाठी कॉलेजच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी सभागृह खचाखच भरलेले होते.
‘जेव्हा लोकशाही अधिकार तुमच्याजवळ नसतात तेव्हा तुम्हाला त्यांचे मोल समजते’ असे सांगून त्या म्हणाल्या, की ‘येथे ज्या गोष्टी गृहीत धरल्या आहेत त्या मिळवण्यासाठी आम्ही बर्मात (म्यानमार) लढत आहोत. आमच्या देशाच्या लोकशाही लढय़ात मला भारताची मदत हवी आहे. आम्ही लोकशाही मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत, त्यात आम्हाला तुमची गरज आहे, तुमची मदत आम्हाला हवी आहे.’
‘विद्यार्थ्यांनी कधीही मूल्यांशी तडजोड करू नये, मूल्यहीन राजकारण ही जगातली सर्वात धोकादायक गोष्ट आहे’ असे त्या म्हणाल्या.