अमित शहांचे पुत्र जय शहांच्या बातमीबाबत भाष्य करणे योग्य ठरणार नाही कारण मी आजचे वर्तमानपत्रच वाचलेले नाही, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय यांच्या कंपनीची उलाढाल एका वर्षात १६ हजार पटींनी वाढल्याची बातमी ‘द वायर’ या वेबसाईटने दिली. त्यानंतर सोमवारी ही बातमी छापूनही आली. मात्र आपण ही बातमी वाचली नसल्याचे सांगत नितीशकुमारांनी कानावर हात ठेवले.

कंपनीचे फायदे-तोटे आणि इतर व्यवहार याबाबत आपल्याला फार काही कळत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाआघाडीला सोडचिठ्ठी देत नितीशकुमारांनी भाजपसोबत जाणे पसंत केले. ऑगस्टमध्ये बिहारमध्ये घडलेल्या या राजकीय नाट्याची चर्चा देशभरात होती.

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. यादव कुटुंबाच्या मालमत्तांवर छापेही पडले. त्यानंतर तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली. राजीनामा देणार नाही, अशी आडमुठी भूमिका तेजस्वी यादव यांनी घेतली. ज्यानंतर नितीशकुमारांनीच मुख्यमंत्रीपद सोडले आणि भाजपसोबत युती करत पुन्हा एकदा बिहारच्या गादीवर बसले. नितीशकुमार भाजपसोबत गेल्याने त्यांच्यावर राजद आणि काँग्रेसकडून बरीच टीका झाली. ‘एनडीटीव्ही’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आता काँग्रेसने जय शहा यांच्या चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलेल्या आरोपांनुसार जय शहा संचालक असलेल्या टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने यंदाच्या वर्षी ८०.०५ कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल केली आहे. तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जय शहा हे नोटाबंदीच्या निर्णयाचे सर्वात मोठे लाभार्थी असल्याचा आरोप केला आहे. याबाबत नितीश कुमार यांनी मात्र सोयीस्कर मौन बाळगत आजचा पेपरच उघडून वाचला नाही असे म्हटले आहे.