एस. जयशंकर यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती होणार असल्याची माहिती आपण स्वतः माजी परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांना दिल्याचा खुलासा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी रात्री केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील समितीने सुजाता सिंग यांची परराष्ट्र सचिव पदावरून हकालपट्टी करीत त्यांच्या जागी अमेरिकेतील भारताचे राजदूत एस. जयशंकर यांची नियुक्ती केली. जयशंकर यांनी गुरुवारीच पदाचा कार्यभारही स्वीकारला. मात्र, या सर्व घटनाक्रमादरम्यान शांत असलेल्या सुषमा स्वराज यांनी गुरुवारी रात्री आपले मौन सोडले आणि ट्विटरच्या माध्यमातून आपली बाजू मांडली.
सरकारला जयशंकर यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करायची असल्याचे आपण स्वतः सुजाता सिंग यांनी कळविल्याचे ट्विट सुषमा स्वराज यांनी केले आहे. त्याचबरोबर सुजाता सिंग यांच्याशी बोलल्याचेही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केले. सरकारच्या निर्णयाचा पुरस्कार करताना त्या म्हणाल्या, जयशंकर येत्या ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे त्यापूर्वी त्यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश काढणे सरकारसाठी आवश्यकच होते.