हेलिकॉप्टर खरेदी भ्रष्टाचारप्रकरणी माजी हवाई दलप्रमुखांची कबुली
निवृत्त हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल एस. पी. त्यागी यांनी आपण हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी एका मध्यस्थाला भेटलो होतो, अशी कबुली दिली, मात्र या खरेदी प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराशी आपला दूरान्वयेही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला.
इटलीची सरकारी विमाननिर्मिती कंपनी फिनमेक्कानिकाकडून १२ हेलिकॉप्टरांची खरेदी करताना, हे कंत्राट मिळवण्यासाठी कंपनीने ३६०० कोटी रुपयांची लाच दिली असल्याचे वृत्त पुढे आले. ही लाच त्यागी यांनाच मिळाली होती का, असा प्रश्न विचारला असता, त्यागी यांनी हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला. मी कालरे यांना माझ्या चुलत भावाकडे भेटलो हे सत्य आहे. मात्र, माझा त्याच्याशी काहीही संपर्क नाही किंबहुना हा संपूर्ण खरेदी व्यवहार मी निवृत्त झाल्यानंतरचा आहे, असे त्यागी यांनी सांगितले.
त्यागी यांची तीन चुलत भावंडे ज्युली, डोक्सा आणि संदीप त्यागी यांच्याकडेही हेलिकॉप्टर खरेदीचे कंत्राट फिनमेक्कानिका कंपनीला मिळावे म्हणून सूत्रे हलविल्याबद्दल संशयाची सुई वळली आहे. मात्र आपल्या आणि भावंडांच्या नात्याला व्यवसायाची मिती नाही, असे त्यागी यांनी निक्षून सांगितले. सदर कंत्राट फिनमेक्कानिका कंपनीलाच मिळावे यासाठी पात्रतेच्या निकषांमध्ये काही बदल केले होते का, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यागी म्हणाले की, २००३ मध्येच हेलिकॉप्टर कशी हवीत याबाबतचे निकष ठरविण्यात आले होते आणि भारतीय हवाई दलाने त्यानंतर त्यामध्ये कोणतेच फेरफार केलेले नाहीत. दरम्यान, फिनमेक्कानिका कंपनीने सदर कंत्राट मिळावे म्हणून एअर चीफ मार्शल एस. पी. त्यागी यांना लाच दिली असल्याचा आरोप, इटलीच्या तपास अधिकाऱ्यांनी केला आहे.