अरुण जेटली यांचा गौप्यस्फोट

इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला मी जून २०१४ मध्ये संरक्षणमंत्री असताना काळ्या यादीत टाकले व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर्सची खरेदी या कंपनीकडून करण्याचा व्यवहार त्यानंतर लगेच जुलैत थांबवला, असा गौप्यस्फोट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. या कंपनीला यूपीएने काळ्या यादीत टाकले व एनडीएने बाहेर काढले हा काँग्रेसचा दावा त्यामुळे फोल ठरला आहे.

एनडीए सरकारचा या प्रकरणात कुठलाही राजकीय हेतू नाही. केवळ हेलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात दलाली कुणाला मिळाली हे शोधणे एवढाच हेतू आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आज आम्ही या व्यवहारातील संशयितांना दलाली नक्की मिळाली आहे हे समजल्याच्या टप्प्यावर आहोत त्यामुळे आता चौकशीस पूर्ण वाव आहे. कुणीतरी दलाली घेतली हे आता स्पष्ट झाले आहे. संरक्षण खरेदीच्या निर्णयात बाह्य़ शक्तींनी हस्तक्षेप केला असावा व ज्यांनी लाच दिली त्यांच्यावर इटलीत दोषारोप सिद्ध जाले आहेत. आता भारतात त्याचे लाभार्थी कोण आहेत हे आम्ही शोधत आहोत. इटलीतील निकालामुळे गंभीर चौकशीस पाश्र्वभूमी मिळाली आहे. यूपीएने ऑगस्टा वेस्टलँडला काळ्या यादीत टाकले व एनडीएने त्या कंपनीला त्यातून बाहेर काढले हा काँग्रेसचा दावा बिनबुडाचा आहे, असा आरोप करून जेटली म्हणाले की, ऑगस्टा वेस्टलँडला ९ जून २०१४ रोजी मी काळ्या यादीत टाकले व नंतर महाधिवक्तयांच्या सल्ल्याने तीन जुलैला कंपनीशी व्यवहार बंद करण्याचे ठरवले.

मे २०१४ ते नोव्हेंबर २०१४ दरम्यान जेटली यांच्याकडे संरक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार होता.