नोटाबंदीनंतर मोदी सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, प्राप्तिकर विभागाने बुधवारी देशभरात ४०० बेनामी मालमत्ता उघड झाल्याचे जाहीर केले. यातील २४० हून अधिक प्रकरणांमध्ये ६०० कोटींच्या मालमत्तेचा समावेश असल्याचे विभागाने स्पष्ट केले.

त्यामध्ये देशभरातील २४ प्रकरणे उघडकीस आणण्यात आली होती. त्यानंतर चालू असलेल्या कारवाईत २३ मेपर्यंत एकूण ४०० प्रकरणे उघडकीस आणण्यात प्राप्तिकर विभागाला यश आले आहे.

ही कारवाई मुंबई, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश येथे करण्यात आली असल्याचे विभागाने स्पष्ट केले. यातील ४० प्रकरणे ही स्थावर मालमत्तेची असून, त्यांची किंमत ५३० कोटी रुपये इतकी आहे. प्राप्तिकर विभागाकडून मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात बेनामी संपत्तीविरोधी कायद्यांतर्गत या कारवाईला सुरुवात झाली होती. अशाप्रकारे बेनामी मालमत्ता असलेल्या व्यक्तीला सात वर्षांचा कारावास आणि दंड भरावा लागणार आहे.

यामध्ये मूर्त आणि अमूर्त स्वरुपाच्या संपत्तींचा समावेश करण्यात आला असल्याचे विभागाने जाहीर केले आहे. अनेकदा ही संपत्ती प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या नावावर नसते. मात्र त्याचा लाभ त्याच व्यक्तीला होत असतो. आता कारवाई झालेल्या ४०० मालमत्तांमध्ये बॅंक खाती, जमिनी, फ्लॅट आणि दागिने यांचा समावेश आहे.